आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तापरिवर्तनासाठी राष्ट्रवादी-काँग्रेसचा जनसंघर्ष; रायगडावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर नागपुरातील दीक्षाभूमीवरून काँग्रेसचा भाजप सरकारविरोधात एल्गार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड- आरक्षण द्यायचेच होते तर ते गरिबांना द्यायला हवे होते. आयकर भरणाऱ्याला आरक्षण व ज्याची एक वेळ चूलही पेटत नाही अशांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. रायगडावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'निर्धार परिवर्तन संपर्क' यात्रेचा शुभारंभ झाला. त्यानंतर महाडच्या चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून पहिल्या सभेची सुरुवात झाली. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. 

 

पवार म्हणाले, ज्या शिवछत्रपतीच्या नावाचे ब्रँडिंग करून भाजपने सत्ता मिळवली व जनतेची फसवणूक केली. त्या भाजपला धडा शिकवण्यासाठी शिवरायांच्या साक्षीने बळीराजाचे राज्य आणायचे आहे. म्हणूनच हा निर्धार करत आहोत. जातिवादी, कामगारविरोधी, सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर करण्याचा निर्धार करत समविचारी पक्षांना एकत्र घेऊन परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्याला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले. 

 

सेना-भाजपत टीकेची नाटके, युतीसाठी बैठका 
भाजपचे नेते शिवसेनेवर टीका करताना दिसत आहेत. प्रत्यक्षात मात्र दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान युतीबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत हॉटेलमध्ये बैठक झाली, टीका करणे ही त्यांची नाटके आहेत. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष 

 

ओबीसी-मराठ्यांना झुंजवताहेत : भुजबळ 
ओबीसी-मराठा या जातींना आरक्षणाच्या नावावर लढवले जात आहे. दोन्ही समाजाला सांभाळून राहावे लागणार आहे. तुमची-आमची लढाई ही दाणे टाकून झुंजवणाऱ्यांच्या विरोधात आहे. - छगन भुजबळ, नेते 

 

भाजपला हटवल्याशिवाय गप्प बसायचे नाही : मुंडे 
भाजप सरकारला खड्यासारखे बाजूला केल्याशिवाय गप्प बसायचे नाही. पहिली लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमाविरोधी केली व आमचा निर्धार हुकूमशहाविरोधात आहे. शिवसेनेने वाघ चिन्ह बदलून आता शेळीचे लावावे. - धनंजय मुंडे, विरोधी पक्ष नेते 

 

सवर्ण आरक्षण हा सरकारचा निवडणूक जुमला, महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचे काय : चव्हाण 
सवर्ण आरक्षण हा निवडणूक 'जुमला' असून मराठा आरक्षणाचे काय? दोन्ही आरक्षणे न्यायालयात टिकण्याबाबत काँग्रेसला शंका आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. जनसंघर्ष यात्रेच्या अंतिम टप्प्याची सुरुवात गुरुवारी नागपुरातील दीक्षाभूमीवरून झाली. या वेळी ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर सरकार रोज नवनवे मुद्दे उपस्थित करीत आहे. राफेल खरेदीत मोठा घोटाळा निश्चित झाला आहे. अंतिम सत्य बाहेर येईल आणि त्याची सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा लवकरच दिल्लीतून होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान आदी प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
 
जनतेला फसवल्याची फळे भोगावी लागतील 
भाजप-शिवसेनेच्या केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विश्वासघातामुळे देशभरातील जनता संतप्त आहे. दडपशाही सुरू असून याची फळे भाजप-शिवसेनेला पुढील निवडणुकीत भोगावी लागतील. - राधाकृष्ण विखे पाटील 

 

त्यांच्या नाकर्तेपणामुळे आमच्यावर यात्रेची वेळ 
केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही यात्रा काढण्याची वेळ आमच्यावर आली आहे. सरकार जनतेची साफ फसवणूक करत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ असल्याचे चित्र आहे. - माणिकराव ठाकरे, नेते 

 

मोदी सरकारचे फक्त १०० दिवस उरले 
भाजप सरकारकडे कामाच्या जोरावर मते मागायची सोय राहिली नाही. निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्याने मोदी फडणवीसांकडून जुमलेबाजी पार्ट -२ सुरु झाला आहे. मोदी सरकारचे आता १०० दिवसच उरले आहेत. - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष 

बातम्या आणखी आहेत...