आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
नांदेड । नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजप अशी थेट लढत होणार असली तरी उमेदवार कोण हे रहस्य अद्याप गुलदस्त्यातच आहे. उमेदवारी जाहीर करण्याबाबत दोन्ही पक्ष एकमेकांना खो देण्याच्या प्रयत्नात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण करत आहेत. त्यांना उमेदवारी मिळण्याबाबत कोणतीही अडचण नाही. मोदी लाटेतही ते विजयी झाले असल्याने त्यांच्या विजयाबाबत काँग्रेस गोटात शंभर टक्के खात्री आहे. तथापि अशोक चव्हाण यांनीच आपल्याऐवजी पत्नी अमिता चव्हाण यांचे नाव पुढे केले आहे. यावरून अशोक चव्हाणांना राज्याच्या राजकारणात रस आहे. त्यांची नजर राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर आहे, असे बोलले जाते. प्रदेश काँग्रेसकडूनही केंद्रीय नेतृत्वाकडे अमिता चव्हाण यांच्या एकाच नावाची शिफारस करण्यात आली. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल, अशी सर्वांनाच खात्री होती.
एअर स्ट्राइकनंतर चित्र बदलले
पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राइकनंतर संपूर्ण देशात राजकीय चित्र बदलले. त्यामुळे काँग्रेस कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. त्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांनाच उमेदवारी देईल अशी चर्चा सुरू झाली. खुद्द अशोक चव्हाणांनीही कार्यकर्त्याच्या बैठकीत मीही उमेदवार असू शकतो, असे सूतोवाच केले. त्यामुळे आता काँग्रेसतर्फे अशोक चव्हाण की अमिता चव्हाण असा संभ्रम निर्माण झाला आहे. हा गुंता एक-दोन दिवसांत सुटण्याची शक्यता आहे.
भाजपच्या उमेदवारीवर निर्णय
राजकीय गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच काँग्रेसचा उमेदवार जाहीर होणार आहे. भारतीय जनता पार्टी तर्फे जर दुबळा उमेदवार रिंगणात उतरला तर काँग्रेसची उमेदवारी अमिता चव्हाण यांना मिळेल आणि भाजपने तगडा उमेदवार दिला तर प्रदेशाध्यक्ष स्वत: मैदानात उतरतील. दुसरीकडे भाजपही तशीच रणनीती आखत असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपने अशोक चव्हाणांना मैदानात उतरवले तर भाजपतर्फे प्रताप पाटील चिखलीकर यांना मैदानात उतरवण्याचा विचार भाजपच्या गोटात सुरू आहे. तथापि यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारी जाहीर करण्याचा घोळ सुरू राहणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.