Maharashtra Special / अशोक चव्हाणांचा पराभव पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी, जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

पराभवाची नैतिक जबाबदारी अशोक चव्हाण यांनी घेतली

दिव्य मराठी वेब

दिव्य मराठी वेब

Jun 07,2019 05:13:27 PM IST

नांदेड- माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नांदेडमधील काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. त्यासोबतच राजीनामे स्वीकारुन तत्काळ नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी केली आहे.


चव्हाणांचा पराभव स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागल्यामुळेच अशाप्रकारे सामुहिक राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच आपला राजीनामा दिल्याचे सांगितले होते. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निर्णय घ्यावा, असे म्हटले होते. राहुल यांनीही लोकसभा निकालानंतर काँग्रेस कार्यकारीणीकडे आपला राजीनामा सोपवला होता, पण पक्षाने त्यांचा राजीनामा नाकारला. त्यानंतर राहुल गांधींनी पक्षांतर्गत मोठ्या फेरबदलांचे संकेत दिले होते.


अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वात राज्यातील लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या. महाराष्ट्रात 2014 मध्ये काँग्रेसने नांदेड आणि हिंगोली मतदारसंघात विजय मिळवला होता. यावेळी काँग्रेसला याही जागा राखता आल्या नाहीत. फक्त चंद्रपूरमध्ये शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला. अशोक चव्हाण यांनाही स्वत:ची नांदेडची जागा राखता आली नाही. हिंगोलीतून सुभाष वानखेडे यांनाही हिंगोलीची जागा काँग्रेसकडे आणता आली नाही.

अशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीत काँग्रेसने राज्यात चांगली कामगिरी केल्याचे उदाहरण नाही. त्यात लोकसभा निवडणुकीत तर राज्यात काँग्रेसने 48 पैकी केवळ एक जागा जिंकत लाजीरवाणी कामगिरी केली. त्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.

X
COMMENT