आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एमआयएम' 'भारिप'च्या युतीमुळे जनाधार जाण्याची काँग्रेसला भीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारिप बहुजन महासंघ व एमआयएमची युती होणार आहे. दलित आणि मुस्लिम हा वर्ग स्वातंत्र्यापासून आजपर्यंत काँग्रेसचा मुख्य जनाधार राहिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत या युतीमुळे हा जनाधारच डळमळीत होण्याची चिन्हे आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाच या युतीच्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 


राज्याच्या राजकारणात एमआयएमचा चंचू प्रवेशच नांदेडमधून झाला. २०१२ सालच्या महापालिका निवडणुकीत एमआयएमने प्रथम रिंगणात उडी घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरेशदादा गायकवाड यांचा संविधान पक्षही होता. या युतीने १३ जागा मिळवल्या. यात एमआयएमच्या ११ नगरसेवकांचा तर संविधानच्या दोन नगरसेवकांचा समावेश होता. एमआयएमच्या या विजयाने तेव्हा राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली. ओवेसी बंधूंनी नांदेडचा संपर्क सतत वाढवला. परंतु चव्हाणांनी कूटनीतीने राजकीय डावपेच खेळत पुढच्या निवडणुकीपूर्वीच एमआयएमला नामोहरम केले. एमआयएमचे बहुतांश नगरसेवक काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष सय्यद मोईन यांना तुरुंगात जावे लागले. त्यामुळे आॅक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एमआयएम चारीमुंड्या चीत झाली. 


आता युतीचे अस्त्र : नांदेड लोकसभा मतदार संघात दलित आणि मुस्लिम मते निर्णायक आहेत. ही मते आजपर्यंत धर्मनिरपेक्ष पक्षाच्या बाजूला राहिली आहेत. केवळ याच मतांमुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात मोदींची सुनामी असतानाही नांदेड लोकसभा मतदार संघात मात्र काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा चिराही ढासळला नाही. अशोक चव्हाण चांगली आघाडी घेऊन विजयी झाले. एवढेच नव्हे तर नांदेडला लागूनच असलेल्या हिंगोलीतही राजीव सातव विजयी झाले. २०१९ ची निवडणूक तर काँग्रेससाठी करो वा मरोची लढाई आहे. अशा बिकट परिस्थितीत जर भारिप एमआयएम युतीचा तगडा उमेदवार रिंगणात उतरला तर त्याचे मोठे नुकसान काँग्रेसला सोसावे लागणार आहे. त्यामुळे ही युती निवडणूक लढवण्यासाठी कोणते मतदार संघ निवडते याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहेे. नांदेड हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा मतदार संघ आहे. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याच नेतृत्वात राज्यात काँग्रेस निवडणूक लढणार आहे. अशा वेळी भारिप बहुजन महासंघ एमआयएम युती झाल्यास अशोकरावांना घरातच कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. 


यापूर्वीही अशा परिस्थितीतून गेलो आहे 
नांदेड मतदार संघात माझी राजकीय कोंडी करण्यासाठी यापूर्वीही अनेक वेळा प्रयत्न झालेत. परंतु विरोधकांना यश आले नाही. भारिप एमआयएम युतीबाबत आता काहीच सांगता येणार नाही. निवडणुकीला अजून भरपूर वेळ आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहू, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. 


आता फेरबदल झाले 
एमआयएमच्या दारुण पराभवानंतर आता एमआयएमचा दबदबा राहणार नाही, अशी अपेक्षा राजकीय क्षेत्रात व्यक्त केली जात होती. परंतु ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमने कुस बदलायला सुरुवात केली. सय्यद मोईन यांच्याऐवजी आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फिरोज लाला यांच्या हाती एमआयएमची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. सय्यद मोईन आता समाजवादी पक्षाच्या गोटात गेले आहेत. फिरोज लाला यांनी पक्ष बांधणीला सुरुवात केल्याने आता एमआयएमच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच आता ओवेसींनीही आगामी लोकसभा निवडणुकीत एमआयएमची ताकद दाखवण्याचा चंग बांधला आहे. 

बातम्या आणखी आहेत...