आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारवर पवारांचा 'रिमाेट', राष्ट्रवादीसाेबत सत्तेत तरीही काँग्रेसला धास्ती शरद पवारांची

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या सत्तेत सहभागी हाेण्यास राजी असूनही काँग्रेस आपल्या सर्वात जुन्या सहयोगी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी धास्ती अाहे. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असले तरी या सरकारचा 'रिमाेट' शरद पवारांकडे गेल्यास आपल्या पक्षासाठी ते नुकसानकारक ठरू शकते, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटतेय.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी दिल्लीहून पृथ्वीराज चव्हाणांना २०११ मध्ये मुख्यमंत्री म्हणून राज्यात पाठवले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची एक- एक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून साेयीस्कररित्या माध्यमांपर्यंत पाेहाेचवली. तसेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या फाईल्सही दाबून ठेवल्या. परिणामी काँग्रेस- राष्ट्रवादीचे संबंध बिघडले. याच वादातून २०१४ मध्ये अाघाडी सरकारचा कार्यकाळ पूर्ण हाेत अालेला असताना राष्ट्रवादीने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढला. परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. याच वादातून २०१४ मध्ये अाघाडी तुटली व दाेन्ही काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली. मात्र २०१४ मध्ये सत्तेतून पायउतार झाल्यानंतर देशभरात काँग्रेससमाेर भाजपचे तगडे अाव्हान निर्माण केले हाेते. २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे फक्त दाेन खासदार निवडून अाले. विधानसभा निवडणुकीतही अामदार संख्या घटली. त्यामुळे अाता माेदी- शहांच्या नेतृत्वाखाली भक्कम भाजपशी दाेनहात करायचे असतील तर समविचारी पक्षांसाेबत पुन्हा अाघाडी करायलाच हवी, असा सूर महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांमधून व्यक्त हाेऊ लागला. त्याला केंद्रीय नेतृत्वानेही परवानगी दिली. त्यामुळे २०१९ च्या लाेकसभा व विधानसभा निवडणुका दाेन्ही काँग्रेसने अाघाडी करुन लढवल्या. त्याचा लाेकसभेला फारसा फायदा झाला नसला तरी विधानसभेत नेतृत्वहिन काँग्रेसला अपेक्षेपेक्षा चांगला लाभ झाला. विधानसभेत ४४ जागा मिळवून चाैथ्या क्रमांकावर असूनही काँग्रेसला शिवसेना व राष्ट्रवादीच्या साथीने सत्तेत येण्याची संधी मिळाली. पण काँग्रेसला मिळालेल्या यशात त्यांच्या नेत्यांपेक्षा शरद पवारांचा वाटा जास्त अाहे. त्यातही अाता नव्या सरकारवर पवारांचाच 'रिमाेट' चालल्यास राज्यात राष्ट्रवादीचीच पाळेमुळे घट्ट हाेतील व काँग्रेसला भाजपबरोबर राष्ट्रवादीचाही सामना करावा लागेल, अशी भीती काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे.

अहमद पटेल, वेणुगोपाल मुंबईत, मंत्रिपदाबाबत पवारांशी चर्चा

गुरुवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी बुधवारी रात्रीपर्यंत काँग्रेसला आपल्या कोट्यातील संभाव्य मंत्र्यांची नावे निश्चित करायची हाेती. त्यासाठी राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यासाठी मुंबईत तळ ठोकून आहेत. मात्र पवारांशी डिलिंग करण्यात खरगे, बाळासाहेब थाेरात कमी पडू शकतात, अशी धास्ती वाटल्याने काँग्रेसने अहमद पटेल आणि के. सी. वेणुगोपाल रात्रीतून मुंबईला पाठवले. पवारांशी वाटाघाटी करुन चांगले पदे काँग्रेसच्या वाट्याला मिळवण्याची जबाबदारी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा साेनिया गांधींनी या दाेघांवर टाकलेली अाहे.

पृथ्वीराज चव्हाणांना अध्यक्षपद

काँग्रेसच्या वाट्याला १२ ते १३ महत्त्वाची पदे व खाती येऊ शकतात. विधानसभा सभापतिपदासाठी काँग्रेस अडून आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण दोघेही उपमुख्यमंत्री होऊ इच्छितात, परंतु पक्ष पृथ्वीराज चव्हाणांना अध्यक्षपद तर अशोक चव्हाणांना उपमुख्यमंत्री पद देण्याच्या बाजूने अाहे. मंत्रिपदासाठी काँग्रेसकडून मागासवर्गीय नेते नितीन राऊत, वर्षा गायकवाड, प्रणीती शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.

विदर्भाबाबत काँग्रेस पेचात

विदर्भात मंत्रिपद काेणाला द्यावे, याबाबत काँग्रेससमोर पेच आहे. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, रणजित कांबळे आणि सुनील केदारांसारखे दिग्गज स्पर्धेत आहेत. भाजपाचा गड बनलेल्या विदर्भात पुन्हा एकदा जनाधार मिळवण्यासाठी काँग्रेस यशोमती ठाकूर आणि विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपद देऊ इच्छिते. खासदारकी साेडून भाजपशी बंड करणारे नाना पटोलेंचे नावही अाघाडीवर अाहे.