आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'खोटे बोलून काँग्रेस ईशान्येला पेटवत आहे' : पंतप्रधान मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी/ नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायद्यात रूपांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर राजकारण करण्याचा आरोप केला. झारखंडमधील प्रचार सभेत मोदी म्हणाले, काँग्रेसने नेहमीच शरणार्थींचा वापर केला. आता या विधेयकावरून खोटे बाेलून ईशान्येला पेटवू पाहत आहे. परंतु लोकांनी कोणासाठी बळी पडू नये. ईशान्येतील संस्कृती, भाषा, मान, सन्मान आणखी वाढवण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. विशेषत: आसामाच्या लोकांना विश्वास देतो की, कोणीही त्यांचे अधिकार हिरावून घेऊ शकणार नाही. बांगलादेशातून मोठ्या संख्येने लोक येतील अशी अफवा काँग्रेस पसरवत आहे. मात्र, हा कायदा आधीच भारतात आलेल्या शरणार्थींच्या नागरिकत्वासाठी आहे. ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत जे भारतात आले आहेत त्यांच्यासाठी ही तरतूद आहे. ईशान्येतील सर्वच राज्ये या कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत.लुटा,लटकवा हेच काँग्रेसचे नेहमीचे धोरण अाहे. त्यांचे नेते प्रत्येक निवडणुकीत आश्वासन देतात की बाहेरून येणाऱ्या शरणार्थींना नागरिकत्व देतील. मात्र, काय झाले? आता ते उलटले आहेत शेवटी शोषितांना अधिकार मिळायला हवेत की नकोत.

वस्तुस्थिती... रास्व संघ, भाजप कार्यालयांवर संतप्त आंदोलकांचा हल्ला, आमदार, नेत्यांची घरे पेटवली

आसाम, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेशात सलग चौथ्या दिवशी नागरिकत्व दुुरुस्ती विधेयकावरून निदर्शने सुरुच होती. गुरुवारी निदर्शने जास्त तीव्र झाली. आसाम पूर्णपणे असामान्य झालाय. अखिल आसाम विद्यार्थी संघटनेने गुवाहाटीत सकाळी ११ च्या सुमारास आंदोलनाची हाक दिली. कृषक मुक्ती संग्राम समितीने देखील लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आणि शांततेत निदर्शने करण्याचे आवाहन केले. लष्कराने शहरात संचलन केले. अनेक ठिकाणी सैन्य व लोकांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. राज्यातील अनेक भागांत भाजप व आसाम गण परिषदेच्या नेत्यांच्या घरांवरही हल्ले झाले. दिब्रुगडमध्ये निदर्शकांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल व केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांच्या घराला लक्ष्य केले. सोनोवाल यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. संघाच्या एक पदाधिकारी म्हणाले, दिब्रूगड, साद्या, तेजपूरमध्ये रास्व संघ कार्यालयावर हल्ले झाले. तेजपूर, शिवसागरमध्ये भाजप कार्यालयावरही हल्ला झाला. चबुआचे भाजप आमदार बिनोद हजारिका यांच्या घरासमोर निदर्शकांनी आग लावून दिली. डीजीपीच्या वाहनावर दगडफेक केली. आसाममध्ये जोऱ्हाट, गोलाघाट, दिब्रूगड, तिनसुकिया, शिवसागर, बोंगाईगाव, नगाव, गुवाहाटीला त्याचा सर्वाधिक फटका बसला.

संसदेत... ईशान्येत काश्मीरसारखी स्थिती : अधीर रंजन

विरोधकांनी गुरुवारीही संसदेत या मुद्यावरून गदारोळ केला. लोकसभेत काँग्रेस आणि इतर पक्षांच्या खासदारांनी ईशान्य जळत असल्याच्या घोषणा दिल्या. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, काश्मीरसारखी स्थिती ईशान्येत झाली आहे. तेथे लष्कर तैनात करण्यात आले आहे. दोन्ही भाग आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्विट केले की, भाजप ज्यावेळी गांधीजींच्या जयंतीचे १५० वर्षे पूर्ण झाल्याचा गाजावाजा करत होते. त्याचवेळी कॅब सारखे भेदभावपूर्ण, घटनेच्या आत्म्याशी खेळणारे विधेयक घेऊन आले.

पाकला उत्तर... स्वत:चे घर सांभाळावे : परराष्ट्र मंत्रालय

पाकिस्तानने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर केेलेल्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मुर्खपणाने न बोलता देशातील अल्पसंख्याकांच्या स्थितीवर लक्ष द्यायला हवे. आमच्या अंतर्गत विषयांवर नको. रवीश यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केल्याचीही माहिती दिली. मात्र कारण स्पष्ट केले नाही. बांगलादेशाशी आमचे संबंध दृढ आहेत. बांगलादेशातील विद्यमान सरकारने अल्पसंख्याकांच्या चिंतांवर लक्ष दिले आहे.

जल्लोषही... छायाचित्र दिल्लीतील मजनू के टिले येथील आहे. येथे राहणाऱ्या पाकिस्तानातून अालेल्यांनी गुरुवारी नाचत, गाणे गात उत्सव केला. अहमदाबाद आणि भोपाळमध्ये सिंधी समाजाने मिठाई वाटली. प. बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मार्च काढला.