आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्य संपले, सरकार पडले : कर्नाटकात 6 मतांनी गडगडले काँग्रेस-जेडीएस सरकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू, नवी दिल्ली - कर्नाटकातील १४ महिन्यांचे काँग्रेस-जेडीएस सरकार मंगळवारी गडगडले. त्याबरोबरच आमदारांच्या राजीनाम्यांसह एक जुलैला सुरू झालेल्या रहस्यमय राजकीय नाट्यावर पडदा पडला. युतीचे सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात विश्वासदर्शक प्रस्तावावरील चर्चा चार दिवस लांबवल्यानंतर सरकारला मंगळवारी मतदान घ्यावे लागले. सभापतींनी अधिकाऱ्यांच्या मदतीने सभागृहातील एक-एक आमदारांना उभे करत गणना केली. सरकारच्या बाजूने ९९ तर विरोधात १०५ मते पडली. सभागृहात २०४ आमदार उपस्थित होते. बहुमतासाठी १०३ जणांचा पाठिंबा आवश्यक होता. काँग्रेस आमदार आणि सभापती के.आर. रमेश कुमार यांनी मत दिले नाही. मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी रात्री उशिरा राजभवनात जाऊन राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे राजीनामा दिला.


मी अपघाती मुख्यमंत्री, नशिबाने आणले : कुमारस्वामी 
विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदानापूर्वी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भावनिक भाषण केले, ते म्हणाले, मला पदाची हाव नाही. मला राजकारणात यायचे नव्हते, मात्र नशिबाने इकडे आणले. मी अत्यंत संवेदनशील आणि भावनाप्रधान व्यक्ती आहे. माझ्याविरोधातील वृत्तांत पाहिले आणि विचार केला की एवढे झाल्यानंतरही मुख्यमंत्रिपदावर राहायला हवे का? मुख्यमंत्रिपद नेहमीसाठी कोणाचेच नसते. मला खूप वेदना होताहेत आणि पद सोडण्यास तयार आहे. 


येद्दींच्या शपथेनंतर बंडखोर आमदार मुंबईहून परतणार 
काँग्रेस-जेडीएस सरकार पडण्याचे कारण असणारे बंडखोर आमदार सध्या मुंबईतच राहतील. सूत्रांनुसार, भाजपचे नेते येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरच ते कर्नाटकात परततील. 


पुढे काय
सरकार स्थापनेचा दावा करणार येदियुरप्पा 

भाजप येदियुरप्पा यांच्या नेतृत्वात सरकार स्थापनेचा दावा करेल. पक्षाने उशिरा रात्री आमदार गटाची बैठक आयोजित केली होती. सरकार गडगडल्यानंतर येदियुरप्पा म्हणाले की, लोकशाहीचा विजय झाला आहे. येद्दी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतरच राज्यपालांची भेट घेणार आहे.