आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात पुन्हा नाटक : काँग्रेस-जेडीएसचे सरकार अडचणीत; १४ समर्थक आमदारांनी दिले राजीनामे; काँग्रेसने भाजपवर केला आमदार खरेदीचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू/ नवी दिल्ली - कर्नाटकातील १३ महिन्यांपूर्वीचे काँग्रेस-जनता दल सेक्युलर (जेडीएस) आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दोन्ही पक्षांच्या १४ आमदारांनी शनिवारी विधानसभा सभापतींच्या कार्यालयात जाऊन राजीनामे दिले. राजीनाम्यानंतर आमदारांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन राजीनामे दिल्याचे सांगितले. दरम्यान, या आमदारांना एका विशेष चार्टर्ड विमानाने मुंबईमार्गे गोव्याला नेण्यात आले असून रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. राजीनामा देणाऱ्या काँग्रेस आमदारांपैकी एक बी. सी. पाटील यांनी याला पुष्टी दिली. काही माध्यमांनी आमदारांना मुंबईत नेण्यात आल्याचे म्हटले होते. परंतु, भाजप आमदार सी. एन. अश्वत्थ नारायण यांनी या बातम्यांचे खंडन केले. 


राजीनामा देणारे जेडीएस आमदार ए. एच. विश्वनाथ यांनी सांगितले, आनंदसिंहसह काँग्रेस व जेडीएसच्या १४ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. कुमारस्वामी यांच्यावर कुचकामी असल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी आमदारांनी राजीनामे दिले असल्याचे सांगून मंगळवारी याबाबत विचार केला जाईल, असे सांगितले. या १४ आमदारांच्या राजीनाम्यामुळे एच. डी. कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले असून काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र सरकारला धोका नसल्याचे म्हटले आहे. या घडामोडी पाहता अमेरिका दौऱ्यावर असलेले कुमारस्वामी दौरा अर्धवट सोडून परतत असून काँग्रेसने भाजपवर आमदार खरेदीचा आरोप केला आहे. काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी के. सी. वेणुगोपाल सायंकाळी केरळहून बंगळुरूला परतले आणि त्यांनी काँग्रेस आमदारांची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत.
 

सरकार स्थापण्याची तयारी : भाजप
आमदारांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते व केंद्रीय मंत्री 
सदानंद गौडा यांनी राज्यपालांनी भाजपला पाचारण केले तर सरकार स्थापन करण्याची पक्षाची तयारी असल्याचे म्हटले आहे. असे घडलेच तर येदियुरप्पा मुख्यमंत्री असतील.


आम्ही सदस्य नोंदणीत व्यग्र
आमदारांच्या राजीनाम्याशी भाजपचा काही संबंध नाही. आम्ही सध्या सदस्य नोंदणी अभियानात व्यग्र असून घटनाक्रमावर नजर ठेवून आहोत. वेळ येईल तेव्हा निर्णय घेऊ. 
- बी. एस. येदियुरप्पा, विरोधी पक्षनेते, भाजपचे प्रदेश अध्यक्ष

 

भाजपचे आमदार फोडू...
आघाडी सरकारमधील वनमंत्री सतीश जरकीहोली यांनी भाजपवर या आमदारांना आमिषे दाखवून खरेदी केल्याचा आरोप केला. आम्हीही भाजपचे आमदार फोडू शकतो, असेही ते म्हणाले.

 

राजीनामा फाडल्याची तक्रार करणार 
काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे डी. के. शिवकुमार या वेळी बंडखोर आमदारांची समजूत काढू शकले नाहीत. त्यांनी आमदारांची भेट घेतली. कुमार यांनी आमदारांचे राजीनामे फाडून टाकल्याचाही आरोप आहे. 

 

सरकार अल्पमतात... : बसपा, केजीजेपी यांचे प्रत्येकी एक व एक अपक्ष आमदार सरकारसोबत आहेत. बहुमताचा आकडा ११३ असताना एकूण ११८ आमदार सरकारच्या बाजूने होते. आता १४ आमदारांचे राजीनामे मंजूर झाले तर सभागृहात बहुमताचा आकडा १०६ वर येईल. भाजपकडे १०५ आमदार असून दुसरीकडे काँग्रेस-जेडीएसकडे १०४ आमदार राहतील. या स्थितीत भाजप सरकार स्थापन करू शकेल.

 

विधानसभेतील पक्षीय बलाबल
एकूण  :  २२५
बहुमत  :  ११३
काँग्रेस  :  ७९ (सभापतींसह)
जेडीएस  :  ३७
भाजप  :  १०५
(यात राजीनामे देणाऱ्या आमदारांचाही समावेश)