आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निकालानंतर कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळणार ; सदानंद गौडा यांचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कर्नाटकमधील काँग्रेस-जेडी (एस) आघाडीचे सरकार कोसळेल आणि एच. डी. कुमारस्वामी हे शुक्रवार सकाळपर्यंतच मुख्यमंत्री असतील, असा दावा केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी बुधवारी केला. पत्रकारांशी संवाद साधताना गौडा म्हणाले की, कुमारस्वामी हे गुरुवार सायंकाळपर्यंत किंवा फार तर शुक्रवार सकाळपर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील. राज्यात नवे सरकार स्थापन होईल. 


लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेस-जेडी (एस) आघाडीला चांगले यश मिळाले नाही तर त्याचा या सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होईल, असे म्हटले जात आहे. एक्झिट पोलमध्ये आघाडीची कामगिरी वाईट राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन्ही पक्षांनी आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवली आहे, पण खालच्या स्तरावरील कार्यकर्त्यांत अजूनही खूप मतभेद आहेत. विशेषत: मैसुरू, जुन्या मैसुरू भागात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते परस्परांना शत्रू मानतात. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, कर्नाटकमध्ये भाजपला २८ पैकी २१ जागा मिळतील. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला या राज्यात १७ जागा मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप ‘ऑपरेशन लोटस’द्वारे काही आमदारांना आपल्या बाजूला वळवून घेईल आणि त्यामुळे सरकार अस्थिर होईल, अशी भीतीही सत्ताधारी काँग्रेस-जेडी (एस) आघाडीला वाटत आहे.


काँग्रेसच्या आणखी एका आमदाराचा पक्षविरोधी सूर : कर्नाटकमधील आणखी एका काँग्रेस आमदाराने पक्षविरोधी सूर लावला आहे.  लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचा मुद्दा का उपस्थित केला जात आहे, असा प्रश्न काँग्रेसचे आमदार के. सुधाकर यांनी विचारला आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सुधाकर यांची भूमिका पक्षविरोधी मानली जात आहे.


सुधाकर यांनी यांनी मंगळवारी रात्री ट्विटमध्ये म्हटले की, ‘ईव्हीएमशी छेडछाड आणि एक्झिट पोल हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. एक्झिट पोलबाबत चर्चा करत असताना ईव्हीएमशी छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा का उपस्थित केला जात आहे, असा गोंधळ माझ्या मनात निर्माण झाला आहे. एक्झिट पोलच्या निकालातून मतदारांची मतदान केल्यानंतरची भावना व्यक्त होते.’


त्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना सुधाकर यांनी स्पष्ट केले की, एक्झिट पोलचा ईव्हीएम छेडछाडीशी काहीही संबंध नाही... कारण एक्झिट पोल मतदानाच्या दिवशी घेतले जातात. सुधाकर म्हणाले की, एक्झिट पोल विविध माध्यमे आणि व्यावसायिक यांच्यातर्फे एक्झिट पोल घेतला जातो. ते मतदान केंद्रांवर जातात, अनेक मतदारांशी बोलतात आणि त्यांचे मत जाणून घेतात. काही वेळा त्यांचा अंदाज बरोबर येतो, तर काही वेळा तो चुकतो. मग त्यासाठी आपण ईव्हीएमला दोष कसा काय देऊ शकतो? 

 

रोशन बेग यांनीही काँग्रेस नेतृत्वावर केली होती टीका
याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रोशन बेग यांनीही मंगळवारी राज्यातील नेतृत्वावर जोरदार टीका केली होती. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव यांची ‘फ्लॉप शो’ आणि पक्षाचे सरचिटणीस आणि राज्य प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांची ‘विदूषक’ या शब्दांत संभावना केला होती. त्यानंतर आता सुधाकर यांनीही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यानेे काँग्रेसमध्ये आलबेल नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.