आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकमधील वाद : काँग्रेस, जेडीएसच्या नेत्यांची वक्तव्ये क्लेशदायक; मतभेद संपवा - देवेगौडा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकमधील आघाडी सरकारबद्दल काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये क्लेशदायक आहेत. आपण ही बाब काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कानावर घातली असून, मतभेद संपवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी गुरुवारी केले. 


लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या आघाडीला २८ पैकी फक्त एकच जागा मिळाली होती, तर भाजपने २८ पैकी ५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीरपणे एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये केली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेगौडा यांची प्रतिक्रिया आली आहे. देवेगौडा म्हणाले की, ‘राज्य मंत्रिमंडळात अपक्ष आमदारांच्या समावेशानंतर तरी किमान जेडीएस किंवा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कुठलीही जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची गरज नव्हती.’ १३ महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेले आघाडी सरकार आणखी भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आपल्या मंत्रिमंडळात अलीकडेच दोन अपक्ष आमदारांचा समावेश केला होता.
देवेगौडा यांनी राहुल गांधी यांना सांगितले की, ‘पहिल्या दिवसापासून मी खूप दुखावलो गेलो आहे. पण हे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगत आहे. आता तुम्हीच यावर निर्णय घ्यायचा आहे. कर्नाटकमधील तुमच्या पक्षाच्या कुठल्याही नेत्याने सरकारबाबत जाहीर टिप्पणी करून नये, अशी सूचना त्यांना देण्यात यावी.’ 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते म्हणाले होते की, आघाडी सरकार चांगले चाललेले नाही. काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली असती तर चांगली कामगिरी झाली असती. सिद्धरामय्या यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता देवेगौडा म्हणाले की, मी यावर सध्या काहीही प्रतिक्रिया देणार नाही. त्यासाठी भरपूर वेळ आहे. आघाडीमुळे काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांचे मोठे नुकसान होत आहे, असे वक्तव्य काही नेत्यांनी केले होते. 


त्यावर टिप्पणी करताना देवेगौडा म्हणाले की, आघाडी करण्याची संकल्पना आमच्या पक्षाची नव्हती, तर ही संकल्पना यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची होती. आम्हाला आघाडी सरकार नको, असे मी त्यांना सांगितलेही होते. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर आणि मुनियप्पा यांनी आमच्याशी संपर्क साधला. आघाडी सरकार स्थापन करा, असे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत, असे मल्लिकार्जुन खरगे यांनीही मला सांगितले होते. 
 

 

‘एक देश-एक निवडणूक’मुळे संभ्रम निर्माण होईल
‘एक देश-एक निवडणूक’ मुळे मतदारांमध्ये मतदारांत संभ्रम निर्माण होईल, असे मत देवेगौडा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केले. देवेगौडा म्हणाले की, एक देश-एक निवडणूक या संकल्पनेबद्दल माझे काही आक्षेप आहेत. ही संकल्पना राबवण्याइतपत आपण पुढारलेलो नाही. काही लोकांनी या संकल्पनेचे स्वागत केले आहे, तर काहींनी त्याला विरोध दर्शवला आहे. या संकल्पनेत एक मतदान केंद्र लोकसभेसाठी असेल, तर दुसऱ्या बाजूला दुसरे केंद्र विधानसभेसाठी असेल. त्यामुळे गोंधळ निर्माण होईल. अशा स्थितीत फक्त निवडणूक आयोगाचे कर्मचारीच मतदारांना मार्गदर्शन करू शकतील, राजकीय पक्षांच्या एजंटना त्याची परवानगी असणार नाही.