आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजीनाट्य.. बंडखोर आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांना भेटताच काँग्रेसने दिली औरंगाबादची ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/मुंबई- बंडखोरीचा पवित्रा घेतलेले काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आले होते. याबाबत काँग्रेसने दखल घेऊन आपल्याला औरंगाबादची ऑफर दिल्याचा खुलासा खुद्द अब्दुल सत्तार यांनी सोमवारी केला. आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचेही आमदार सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

 

29 मार्चला निर्णय जाहीर करणार

अामदार सत्तार म्हणाले, अशोक चव्हाण हे माझे नेते आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अशोक चव्हाण यांच्याशी फोनवर चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका घ्यायची, याचा निर्णय येत्या 29 मार्चला जाहीर करणार आहे. समर्थक, कार्यकर्ते म्हणाले तरच पुढचे पाऊल टाकणार आहे. पक्षाकडे औरंगाबादची जागा मागितली होती. याबाबत अशोक चव्हाण यांच्याशी बोलणेही झाले होते. जिल्हाध्यक्ष असल्याने सर्वांची नावे दिल्लीला पाठवली होती. दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने सुभाष झांबड यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार नाराज झाले आहेत. सत्तार यांनी अपक्ष लढण्याची घोषणा करत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

 

चव्हाणांचे खंदे समर्थक सत्तार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाणांचे खंदे समर्थक मानले जाणारे व औरंगाबादच्या उमेदवारीवरून पक्षनेतृत्वावर नाराज असलेल्या सत्तारांनी शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास 'वर्षा' निवासस्थानी फडणवीसांची भेट घेतली. या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. या बैठकीत नेमके काय गुफ्तगु झाले याबाबतचा तपशील कळू शकला नसला तरीही काँग्रेस नेतृत्वावर दबाव टाकण्यासाठी सत्तार यांनी ही भेट घेतली असावी, अशी चर्चा आहे. दरम्यान, 'आपण भाजपत जाणार नसून औरंगाबाद येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहोत. याबाबत आपण प्रदेक्षाध्यक्षांना कळवले असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यातून एकाही अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली नाही,' असे सत्तारांनी म्हटले आहे. आपण काँग्रेसचा राजीनामा दिल्याने अपक्ष उमेदवार म्हणून लढण्यात कोणतीही अडचण नसल्याचे ते म्हणाले. गेली साडेचार वर्षे मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघातील विकासासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल या भेटीत आपण त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांप्रमाणेच आपण अजित पवार, जयंत पाटील, प्रकाश आंबेडकर यांसारख्या इतरही प्रमुख पक्षांच्या नेत्यांना भेटणार असल्याचेही सत्तार यांनी सांगितले.

 

औरंगाबादच्या उमेदवारीसाठी इच्छुक असून डावलल्यामुळे पक्षाचा राजीनामा दिल्याचा दावा करणारे सत्तार हे उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचेच एकंदर चित्र होते. सुरुवातीला त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून बहुजन जनसुराज्य पक्ष स्थापन केलेल्या हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे काँग्रेसच्या तिकिटावर औरंगाबादेतून उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. या संपूर्ण कालावधीत सत्तार हे स्वत:च्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी फारसे प्रयत्नशील नव्हते, हे स्पष्ट असतानाही अचानक उमेदवारी न मिळाल्याचा मुद्दा उचलून धरत सत्तार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 

सत्तारांची नाराजी स्वत:साठी की अशोक चव्हाणांसाठी?
सत्तार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात. चव्हाणांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातच सत्तारांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते. त्यातच चंद्रपूर मतदारसंघातून चव्हाणांची शिफारस डावलून हायकमांडने विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. शिवाय इच्छेविरुद्ध नांदेड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने अशोक चव्हाणही अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थता व नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचावी यासाठी सत्तारांनी हे नाराजीनाट्य रचल्याची चर्चा आहे. शिवाय खुद्द सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, चव्हाणांचा शब्द पक्षनेतृत्वाकडून डावलला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे सत्तारांची नाराजी पक्षनेतृत्वावर दबाव टाकण्यासाठी आहे का, असाही मुद्दा उपस्थित झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...