आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिताची राजकारणात एन्ट्री; जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भरणार अर्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदापूर (जि. पुणे) - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता यांनीही आता सक्रिय राजकारणाचा श्रीगणेशा केला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे अंकिता पाटील गुरुवारी अर्ज दाखल करत आहेत. 


इंग्लंडमधील प्रख्यात हार्वर्ड युनिव्हर्सिटीसह लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स विद्यापीठातून शिकलेल्या अंकिता यांनी अगदी गावपातळीवरील राजकारणापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ करण्यास पसंती दिली. अंकिता या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा आहेत. याशिवाय नवी दिल्लीच्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्याही सदस्या आहेत. 


बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या सदस्य आणि हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. तेथे आता २३ जून रोजी  पोटनिवडणूक हाेत आहे. इंदापुरातील शहाजीनगरमधील काँग्रेसच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी अंकिता पाटील यांच्या उमेदवारीची मागणी केली होती. विशेष म्हणजे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील यांची कन्याही लवकरच सक्रीय राजकारणात सहभागी होणार आहे.


पाटील घराण्याची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात 
काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार शंकरराव पाटील यांचा वारसा कायम ठेवत त्यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण गाजवले. राज्यात आघाडी सरकारमध्ये ते सहकारमंत्री होते. तत्पूर्वी १९९५ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या हर्षवर्धन यांनी युती सरकारला पाठिंबा देत मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवले हाेते. आता त्यांची उच्चविद्याविभूषित कन्या अंकिता पाटील यांनीही राजकारणाची वाट चोखाळली आहे.