आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आऊट ऑफ रेस! : मुंबईत काँग्रेस अवघ्या पाच जागांपुरती मर्यादित, त्याही टिकवून ठेवण्याचे आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनोद यादव

मुंबई - गेल्या पाच वर्षांपासून मुंबई- ठाणे परिसरात उतरती कळा लागलेल्या काँग्रेसचे २०१४ मध्ये या भागात फक्त पाच आमदार निवडून आले. मात्र नुकत्याच झालेल्या लाेकसभा निवडणुकीत सुपडासाफ झाल्याने विद्यमान आमदारांच्या या पाच जागा तरी पुन्हा निवडून येऊ शकतील का? असा प्रश्न निर्माण हाेत आहे. वडाळातील पक्षाचे आमदार कालिदास काेळंबकर व उत्तर भारतीयांचे नेते म्हणून आेळख असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते कृपाशंकरसिंह यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठाेकत भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षाला माेठा धक्का बसला आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मुंबईतील ३६ पैकी फक्त ५ जागा मिळाल्या हाेत्या. यापैकी कालिदास काेळंबकर या आमदाराचा तर फक्त ८०० इतक्या निसटत्या मताधिक्याने विजय झाला हाेता. मुंबादेवीचे अमीन पटेल ८,५१३, तर धारावीतून वर्षा गायकवाड या १५,३२८ मतांनी विजयी झाल्या हाेत्या. चांदिवलीतून नसीम खान २९,४६९, मालाड- पश्चिममधून असलम शेख २,३०३ मतांनी विजयी झाले हाेते. यापैकी काेळंबकरांनी आता पक्ष साेडल्याने एक जागा कमी झाली आहे. शेख फक्त अत्यल्प मतांनी जिंकले हाेते. या वेळी मुस्लिम, उत्तर भारतीय व मराठी भाषिकबहुल जागा वाचवण्यासाठी काँग्रेसला शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. चांदिवली व मुंबादेवीची जागा मुस्लिमबहुल, तर धारावीची जागा दलितबहुल असल्याने या तीन जागांबाबतच काँग्रेस सध्या निश्चिंत दिसते.
 

कृपा, राजहंस, रमेशसिंह यांनी पक्षाला आणले ‘अच्छे दिन’
एकेकाळी मुंबई काँग्रेसचे नेतृत्व उत्तर भारतीय ब्राह्मण समाजाकडे हाेते. रमेश दुबे व चंद्रकांत त्रिपाठींसारख्या नेत्यांचा मुंबई व परिसरात दबदबा होता. कालांतराने कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह व ठाकूर रमेशसिंह यासारख्या उत्तर भारतीयच, पण क्षत्रिय समाजाकडे नेतृत्व गेले. या काळात पक्ष मजबूत झाला. आता उत्तर भारतीय क्षत्रिय समाजाच्या दिग्गज नेत्यांनी पक्षाला साेडचिठ्ठी दिल्याने पुन्हा ब्राह्मण नेतृत्वाकडे धुरा साेपवण्याच्या तयारीत पक्ष आहे.