आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - राधाकृष्ण विखे- पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसने त्यांच्या वारसदारांचा शोध सुरू केला असून नेता निवडीसाठी सोमवारी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. या वेळी कदाचित तरुण चेहऱ्याला संधी दिली जाईल, अशी माहिती काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने रविवारी दिव्य मराठीशी बोलताना दिली. मात्र, विधानसभेतील संख्याबळ पाहून अध्यक्षच विरोधी पक्षनेते पद कोणाला द्यायचे याचा निर्णय घेणार असल्याने विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस की राष्ट्रवादीला मिळेल हे अधिवेशन काळातच स्पष्ट होणार आहे.
या पदासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना काँग्रेसच्या नेत्याने सांगितले, तसे पाहिले तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद गेले पाहिजे. कारण ते मुख्यमंत्री होते आणि सरकारच्या निर्णयांची त्यांना चांगली माहिती आहे आणि ते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला धारेवर धरतील. मात्र, तसे होणार नाही असे दिसत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्यास नकार दिल्याचे कळते. त्यामुळे त्यांच्या नावावर विचार होईल असे मला वाटत नाही. कदाचित एखाद्या तरुण चेहऱ्याकडे ही जबाबदारी दिली जाईल. अर्थात सोमवारच्या बैठकीत आम्ही सगळे काही नावांवर विचार करून नंतर ती नावे हाय कमांडकडे पाठवली जाणार आहेत. हायकमांड जो निर्णय घेईल तो विरोधी पक्षनेता बनेल, असेही या नेत्याने सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे पद जाण्याची शक्यता
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असून तो काँग्रेस हायकमांडने स्वीकारला आहे. मात्र, तो अजून विधानसभा अध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठवला नाही. या आठवड्यात अध्यक्षांकडे राजीनामा मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. काँग्रेसने एकीकडे विरोधी पक्षनेते पद मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहूनच अध्यक्ष विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यायचे याचा निर्णय घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच पक्षांच्या आमदारांच्या संख्येत बदल होणार असला तरी सगळ्यात जास्त बदल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच होणार असून राष्ट्रवादीचे आमदार जास्त संख्येने असणार आहेत. त्यामुळे अध्यक्ष कदाचित राष्ट्रवादीलाही विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर देऊ शकतात आणि राष्ट्रवादीनेही याची तयारी केली असल्याचे सांगितले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.