आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार अब्दुल सत्तार यांना खुर्चीचा मोह सोडवेना.. औरंगाबादेतील गांधी भवनातील खुर्च्याही नेल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्याच्या निमित्ताने सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर आपण अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले. येत्या शुक्रवारी म्हणजे 29 तारखेला समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांचा निर्णय अंतिम होणार आहे. याच सत्तार यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना काँग्रेस मुख्यालय गांधी भवनासाठी खरेदी केलेल्या 150 खुर्च्या त्यासाठी येथून गायब केल्या आहेत. 'मी खरेदी केल्या होत्या. त्यामुळे मी घेऊन आलो' असा त्यांचा दावा आहे. पक्षासाठी एखादी वस्तू खरेदी केली तर ती ओघानेच पक्षाची होते, परंतु सत्तार मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. माझा खर्च, माझी मालमत्ता असे म्हणत त्यांनी खुर्च्या लांबवल्या. खुर्च्या नेल्यानंतरही माइक मात्र अजून ठेवले आहेत, असे सत्तार छातीठोकपणे म्हणाले.

 

खुर्च्यांचे गणित..
गांधी भवनात 300 खुर्च्या आहेत. पूर्वी काही कार्यक्रम असेल तर खुर्च्या भाड्याने घेतल्या जात असत. परंतु सत्तार जिल्हाध्यक्ष व नामदेव पवार शहराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी खुर्च्या विकत घेण्याचे 'फिफ्टी-फिफ्टी' गणित ठरवले. त्यानुसार दोघांनीही प्रत्येकी दीडशे खुर्च्यांसाठी पैसे दिले. या खुर्च्या गांधी भवनात पडून असत. तेव्हा जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष हे त्यांच्या कार्यक्रमासाठी या खुर्च्या नेत. पक्षाचा अन्य कार्यक्रम असेल तरीही त्या नेल्या जात. मंगळवारी सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:चे कार्यालय थाटले. त्यासाठी ते या खुर्च्या घेऊन गेले. माझी खरेदी, माझीच मालमत्ता असाच काहीसा हा प्रकार असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू झाली होती.

 

सत्तार यांना पक्षाशी देणे-घेणे नाही..
जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी खुर्च्या खरेदी केल्या असल्या तरी नंतर ती आपोआप पक्षाची मालमत्ता होती. परंतु पक्ष हीच माझी मालमत्ता अशी धारणा सत्तार यांची झाली असावी, त्यामुळेच त्यांनी खुर्च्या पळवल्या. अर्थात यातून काय अर्थ काढायचा तो निघाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्त्याने दिली. पक्षासाठी मी मरमर केली, असे सत्तार यांनी यापुढे म्हणू नये. कारण ते पक्षासाठी नव्हे, तर स्वत:साठीच सर्व काही करतात हे दिसून येते, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या कार्यकर्त्याने दिली.

 

दिवसभर टीकेची झोड उठल्यानंतर रात्रीच्या वेळी काही खुर्च्या गांधी भवनात आणून ठेवण्यात आल्या. मात्र, त्या सत्तार यांनी नेलेल्याच होत्या का, हे समजू शकले नाही.

 

सत्तार हे अजूनही आमचेच
येथे काही खुर्च्या मी खरेदी केल्या होत्या, तर काही सत्तारांनी. बाहेर कार्यक्रम असेल तर येथील खुर्च्या नेल्या जात असत. त्यांनी आताही काही कार्यक्रमासाठी खुर्च्या नेल्या असाव्यात. त्या खुर्च्या गांधी भवनात परत येतील. सत्तार हे अजूनही आमचेच आहेत. त्यामुळे त्यांना येथून खुर्च्या नेण्याचा अधिकार आहे.
- नामदेव पवार, शहराध्यक्ष, काँग्रेस.

 

बोलण्यासाठी माइक ठेवले
'दिव्य मराठी'शी बोलताना सत्तार म्हणाले, गांधी भवनात खुर्च्या, माइक असे बरेच साहित्य मी खरेदी केले होते. पक्ष म्हणून नव्हे, तर वैयक्तिक पातळीवर ही खरेदी होती. मी फक्त खुर्च्या आणल्या आहेत. माइक तसेच ठेवले. त्यांना बोलता यावे यासाठी, असे ते म्हणाले.

 

आता नवीन उमेदवाराने खरेदी करून द्याव्यात
खुर्च्या मी खरेदी केल्या होत्या. माझ्या नावावर. आता मी नवीन कार्यालय उघडले. हजारो कार्यकर्ते येताहेत. तेव्हा मी माझ्या खुर्च्या घेऊन आलो. आता खासदारकीच्या उमेदवाराने नवीन खुर्च्या घ्याव्यात.
- अब्दुल सत्तार, बंडखोर आमदार