आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या ऐनवेळच्या राजकीय खेळीने काँग्रेस-राष्ट्रवादी अन् शिवसेनाही घायाळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणापासून दूर दिसत असले, तरी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी केडगावमध्ये मोठी राजकीय खेळी केली. व्याही भानुदास कोतकर यांच्या समर्थकांना ऐनवेळी भाजपत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही कर्डिले यांनी मोठा धक्का दिला. त्यांच्या या राजकीय खेळीने घायाळ झालेल्या राष्ट्रवादीला अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही प्रभागांत उमेदवार देता आला नाही. काँग्रेसने मात्र दोन्ही प्रभागांतील आठही जागांवर उमेदवार दिले आहेत.


केडगावमध्ये शिवसेनेने आपले अधिकृत उमेदवार सर्वांत अगोदर जाहीर केले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपने आपले इच्छुक शोधून ठेवले होते, पण एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नव्हती. अखेरच्या दिवशी अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर होतील, अशीच सर्वांना अपेक्षा होती. परंतु सोमवारी सायंकाळी उशिरा मोठ्या राजकीय उलथापालथीला सुरुवात झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी तुम्हाला भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत, असा निरोप आमदार कर्डिले यांच्याकडून आघाडीच्या इच्छुकांना ऐनवेळी देण्यात आला. या निरोपाने केडगाव उपनगरासह शहरातील राजकीय चित्र बदलत गेले. काय चालले ते कुणाला काहीच समजत नव्हते. मंगळवारी पहाटेच सर्व इच्छुकांना कर्डिले यांनी बोलावून घेत तुम्हाला फक्त भाजपकडून अर्ज दाखल करायचा आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नाही, याची स्पष्ट कल्पना देत त्यांना योग्य तो कानमंत्रही कर्डिले यांनी दिला.

 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासह इतर सर्व राजकीय खेळी बाजार समितीमधील कर्डिले यांच्या कार्यालयातून पार पडली. केडगावमध्ये सकाळपासून या राजकीय भूकंपाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. परंतु त्यास अधिकृत दुजोरा मिळत नव्हता. या चर्चेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या गोटातही शांतता होती. दुपारी दीडच्या सुमारास या सर्व इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केले. कर्डिले यांच्या या राजकीय डावाने काँग्रेस-राष्ट्रवादी अन् शिवसेनाही घायाळ झाली आहे. येथील राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या २ जागांपैकी एकाही जागेवर राष्ट्रवादीला उमेदवार देता आला नाही. काँग्रेसने मात्र ऐनवेळी कसेबसे आठ उमेदवार उभे केले.

 

केडगावात काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार
दरम्यान, केडगाव उपनगर काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर व भानुदास कोतकर यांचा बालेिकल्ला म्हणून ओळखला जाते. या बालेिकल्ल्याला भाजपने खिंडार पाडून निवडणुकीची सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत. विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यात महापालिका िनवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. संपूर्ण राज्यात व देशात लक्ष घालणारे विखे, थोरात या निवडणुकीत मात्र अिलप्त असल्याचे दिसते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीची जबाबदारी डॉ. सुजय विखे यांच्यावर टाकली आहे. त्यामुळे थोरात गट नाराज असल्याचे बोलले जाते. िनवडणुकीच्या तोंडावर देखील सुजय विखे हे राष्ट्रवादीच्या संपर्कापासून दूर होते. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडीदेखील दोन िदवस लांबणीवर पडली होती. अखेर दोन दिवसांपूर्वी विखे व आमदार संग्राम जगताप यांच्यात समझोता होऊन जागांचे वाटप झाले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतील आघाडीचा तिढा सुटला होता. आता सर्व सुरळीत झाले असताना काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या केडगावात मात्र भाजपने वेगळी खेळी खेळून निवडणुकीपूर्वीच हा बालेकिल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे.


भाजपच्या आठ जागांपैकी ५ कोतकर गट, २ खासदार गांधी, तर १ जागा मिळाली आगरकर गटाला
केडगावमधील कोतकर समर्थकांनी मंगळवारी ऐनवेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासमवेत खासदार दिलीप गांधी, निरीक्षक सुजितसिंह ठाकूर.


निवडणूक लढवणारे उमेदवारच अनभिज्ञ...
केडगावमधील काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील इच्छुकांनी ऐनवेळी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले खरे, पण अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना आपण अधिकृत उमेदवार आहोत का? हेच माहिती नव्हते. कारण उमेदवारी अर्ज दाखल करताना देण्यात येणारा पक्षाचा एबी फाॅर्म त्यांना देण्यात आला नव्हता. तो पक्षाच्या विशिष्ट व्यक्तीकडून निवडणूक कार्यालयात जमा करण्यात आला. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत मिळेल त्याच्याकडून माझे नाव अधिकृत उमेदवारांमध्ये आहे का? याबाबत उमेदवार चौकशी करत होते.


केडगाव उपनगरातील उमेदवार
प्रभाग क्रमांक १६ - शिवसेना - सुनीता कोतकर, शांताबाई शिंदे, विजय पटारे, ज्ञानेश्वर येवले. भाजप - सुनीता कांबळे, गणेश सातपुते, सुनीलमामा कोतकर, ज्योती सातपुते. काँग्रेस - सुमन गायकवाड, शोभा कोतकर, गणेश भोसले, पोपट कराळे.
प्रभाग क्रमांक १७ - शिवसेना - सुभाष कांबळे, मोहिनी लोंढे, मनीषा कारखेले, दिलीप सातपुते. भाजप - राहुल कांबळे, गौरी ननावरे, लताबाई शेळके, मनोज कोतकर. काँग्रेस - सागर भिंगारदिवे, कांचन शिंदे, रेणुका सुंबे, राहुल चिपाडे. मनसे - दत्तात्रय केंद्रे, अलका भाले, लता कोतकर

बातम्या आणखी आहेत...