आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादीची मित्रपक्षांकडून कोंडी; ५५ मतदारसंघांसाठी आग्रही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादीने मित्रपक्षांना विधानसभा निवडणुकीसाठी ३८ मतदारसंघ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या प्रस्तावाला ठाम नकार देत मित्रपक्षांनी ५५ जागांची मागणी केली. त्यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीची काेंडी झाली असून त्यामुळेच आघाडीच्या जागावाटपाचा घाेडे अडले असल्याची माहिती आहे.
 
काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभेसाठी यावेळी फिफ्टी-फिफ्टी सूत्र या वेळी निश्चित केले होते. त्याअंतर्गत १२५ : १२५ जागा दोघांनी वाटूनही घेतल्या. उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात सोमवारी रात्री उशिरापर्यंत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी सर्वांचा या विषयावर माेठा खल झाला.  या बैठकीत शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली. ‘केवळ ३८ जागा आम्ही घेणार नाही. आम्हाला ५५ जागा हव्या आहेत,’ असे त्यांनी ठामपणे सांगितले.  त्यामुळे आता काँग्रेस, राष्ट्रवादीला मित्रपक्षांसाठी त्यांच्या वाट्याच्या किमान आठ, आठ जागांवर आता पाणी सोडावे लागणार आहे. आघाडीत एकूण आठ मित्रपक्ष आहेत. त्यातील शेकाप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाच बऱ्यापैकी जनाधार आहे. आघाडीत या दोन्ही पक्षांच्या वाट्यास दोनअंकी जागा येणार आहेत. समाजवादी पक्षाला ३ जागा, रिपाइं (कवाडे गट) ५ जागा, वंचित बहुजन आघाडी (महाराष्ट्रवादी) १ जागा, रिपाइं (संसारे गट)  ३ जागा, भाकप १, लोकभारती १ इतक्या जागांची मागणी घटक पक्षांतील छोट्या पक्षांनी केली हाेती. 
 

लहानसहान पक्षांची आता अघोषित तिसरी आघाडी
राज्यात आजपर्यंत पुरोगामी छोटे पक्ष काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांशी समान अंतर ठेवून असत. विधानसभेला ते तिसरी आघाडी स्थापन करत. बदललेल्या परिस्थितीत तिसरी आघाडी शक्य नाही. मात्र शेकापचे जयंत पाटील, लोकभारतीचे कपिल पाटील व स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी छोट्या पक्षांना बरोबर घेत आघाडीमध्येच अघोषित अशी तिसरी आघाडी स्थापन केली असून ते काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलेच झुलवत असल्याचे दिसते.