आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २६ दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. राज्यातील घडामोडींबाबत गल्लीपासून दिल्लीपर्यंत खलबते सुरूच आहेत. मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक हाेणार होती. मात्र, काँग्रेसचे प्रमुख नेते इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमांत व्यग्र असल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात अाली. अाता बुधवारी सायंकाळी ५ वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी या दाेन्ही पक्षांतील नेत्यांत चर्चा हाेणार अाहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये मंगळवारी एक बैठक झाली. शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी बुधवारी होणाऱ्या बैठकीत काँग्रेसकडून सरचिटणीस अहमद पटेल, महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यासह प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार; तर राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, विधिमंडळ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सहभाग असेल. शरद पवार व साेनिया मात्र उपस्थित नसतील. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांतील किमान समान कार्यक्रमावर या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली होती. मात्र, यावेळी सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली नसल्याचे शरद पवारांनी म्हटले होते.
शिवसेना आमदार-नेत्यांची शुक्रवारी बैठक
मुंबई : शिवसेनेनेही शुक्रवारी मुंबईत आपल्या नवनिर्वाचित आमदारांसह ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमदारांना सत्तास्थापनेच्या हालचालींबाबत माहिती देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सत्तास्थापनेबाबत जलदगतीने निर्णय घ्या, अशी विनंती शिवसेनेकडून काँग्रेस पक्षश्रेष्ठींना करण्यात आल्याचीही चर्चा आहे.
संजय राऊतांनी पुन्हा घेतली पवारांची भेट
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी दिल्लीत पुन्हा शरद पवारांची भेट घेत १० मिनिटे चर्चा केली. तत्पूर्वी, सकाळी ते म्हणाले की, डिसेंबरच्या सुुरुवातीस राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात येईल. राज्यात स्थिर सरकार असेल, असा दावाही त्यांनी केला. शरद पवारांना समजून घेण्यासाठी १०० जन्म लागतील, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. दरम्यान, साेमवारी रात्रीपासून दिल्लीत दाखल झालेले काँग्रेस- राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांनीही संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याची माहिती अाहे.
काँग्रेसचे बहुतांश अामदार सत्तेत येण्यास उत्सुक
महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर साेमवारी शरद पवार व काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात बैठक झाली. त्यानंतर मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, ए. के. अँटनी आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी साेनियांची भेट घेऊन पुन्हा एकदा या विषयावर चर्चा केली. राज्यातील काँग्रेस आमदार शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सोनियांना सांगितले. त्यासाठी उशीर झाल्यास पक्षाचे नुकसान होऊ शकते, असेही त्यांनी साेनिया गांधी यांना कळवल्याचे वृत्त आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.