आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेतृत्वाचा परभणी, पाथरीकडे कानाडोळा; वरपूडकर, रविराज एकाकी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी : गेल्या ३५ वर्षांच्या राजकारणात ११ निवडणुका लढवलेले माजी मंत्री सुरेश वरपूडकर हे १२ व्या वेळेस पाथरीतून तर पहिल्यांदाच परभणीतून निवडणूक रिंगणात उतरलेल्या रविराज देशमुखांच्या प्रचारासाठी राज्य पातळीवरच्या काँग्रेस नेत्यांची एकही सभा या दोन्ही मतदारसंघात झाली नाही. त्यामुळे राज्य नेतृत्वाने जणू या दोन्ही मतदारसंघाकडे कानाडोळा केल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, श्री वरपूडकर हे आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रचाराची यंत्रणा जोमाने राबवू लागले आहेत. तर नवखे असलेले रविराज देशमुख हेही स्थानिक नेतेमंडळींच्या पुढाकाराने अत्यंत मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेले आहेत. मात्र काँग्रेसच्या या उमेदवारांची झुंज शिवसेना-भाजपच्या विद्यमान आमदारांशी असल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

१९९० पासून परभणी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. या मतदारसंघात उमेदवारी देण्यावरच काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी उफाळून आली होती. जिंतूरचे माजी आ.(कै.) कुंडलिक नागरे यांचे चिरंजीव सुरेश नागरे यांनी उमेदवारांच्या दृष्टीने तयारी केली असताना त्यांना झालेल्या विरोधानंतर प्रथमच निवडणूक लढवणारे रविराज देशमुख यांना काँग्रेसने रिंगणात उतरवले. माजी खा.(कै.) अशोक देशमुखांचा राजकीय वारसा असलेल्या रविराज यांनीही पक्ष नेतृत्वाशिवाय या मतदारसंघात प्रयत्नांची शिकस्त चालवली आहे. त्यांना माजी खा.तुकाराम रेंगे पाटील, माजी आ.सुरेश देशमुख, मनपा सभागृह नेते भगवानराव वाघमारे यांची भक्कम साथ मिळत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, शहर जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांनीही त्यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवली आहे. 


पाथरीमध्ये माजी मंत्री वरपूडकर हे आ.बाबाजानी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या सहभागाने मोठी यंत्रणा राबवत आहेत. आ.मोहन फड यांच्याशी त्यांची लढत असल्याने सर्व राजकीय कसब त्यांनी पणाला लावले आहे. राजकीय कारकीर्दीपासूनच सुरुवातीचा मतदारसंघ असल्याने वरपूडकरांनी जुनी समीकरणे जुळवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत रणांगणात शह देण्याचाच प्रयत्न चालवला आहे.

दरम्यान, या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाकडून कोणीही या मतदारसंघात एकही सभा घेतली नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर एकाकी झुंज देण्याची वेळ वरपूडकर, देशमुख यांच्यावर आली आहे.

अशोक चव्हाण वेशीवरूनच परतले
शेजारच्या जिल्ह्यातील व काँग्रेसचे नेते असलेले अशोक चव्हाण हे श्रीक्षेत्र त्रिधारा येथे दोन दिवसांपूर्वी दर्शनासाठी आले. परंतु त्यांनीही परभणी वा पाथरीत येण्यासाठी फारसे स्वारस्य दाखवले नाही. वेळेचा अभाव हे निमित्त असले तरी, त्यांचा काही क्षणांचा दौराही रविराज देशमुख यांच्यासाठी संजीवनी देणारा ठरला असता. मात्र तेही वेशीवरूनच परतल्याने काँग्रेसजणांची निराशा झाली.
 

बातम्या आणखी आहेत...