आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress News In Marathi, Narendra Modi, Digvijay Singh, Jaitely, Divya Marathi

कॉंग्रसेची खेळी: मोदींच्या विरोधात दिग्विजयसिंह, जेटलींसाठी अमरिंदर यांचा विचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून संकटमोचन मंदिर महंतांच्या कुटुंबीयांसह काशी नरेशांच्या नातेवाइकांचीही मनधरणी केली जात आहे. त्यातच बुधवारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांचे नावही चर्चेच आले. अमृतसरमध्ये काँग्रेस अरुण जेटलींच्या विरोधात कॅप्टन अमरिंदरसिंह यांना तिकीट देण्याचा विचार करत आहे.


काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यासंदर्भात काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांबरोबर चर्चा केली. पक्षाला आधी या ठिकाणाहून एखाद्या सेलिब्रिटी उमेदवाराचा शोध होता; पण स्थानिक जातीय समीकरण आणि वाराणसीची संस्कृती व परंपरेचा विचार करता त्या दृष्टीने मोदींना प्रतिस्पर्धी शोधला जात आहे. दिग्विजयसिंहही या जागेसाठी दावेदार ठरू शकतात. तसेच काँग्रेसचे माजी खासदार राजेश मिश्र आणि पक्षाचे आमदार अजय राय यांची नावेही चर्चेत आहेत.
मोदींना चर्चेचे आव्हान : काँग्रेस मोदींबरोबर कोणत्याही मुद्द्यावर खुली चर्चा करण्यास तयार असल्याचे आव्हान आनंद शर्मा यांनी दिले आहे. मोदींना सुरक्षित मतदारसंघ कशासाठी हवा आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


दिग्विजयच का?
मोदींच्या विरोधात वक्तव्ये करण्यास आघाडीवर असणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह वाराणसीमधून निवडणूक लढवू शकतात. सूत्रांच्या मते सपाही या नावाला होकार देईल, असा विश्वास पक्षाला आहे. दिग्विजय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 10 वर्षांपासून त्यांनी निवडणूक लढवलेली नाही. त्यांना वाराणसीमध्ये ठाकूर समाजाचे समर्थन मिळू शकते, अशी काँग्रेसला आशा आहे. ते साधू-संतांबरोबरही चर्चा करू शकतात.


जेटलींच्या विरोधात अमरिंदर
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्याविरोधात अमृतसरमध्ये काँग्रेस कॅप्टन अमरिंदरसिंह यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. अमरिंदर यांनी पंजाबचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले आहे. त्यांच्याशी तुलना झाल्यास जेटली बाहेरून आलेले उमेदवार ठरतील. शीख मतदारांना वळवण्यात त्यांनी जेटलींच्या तुलनेत अधिक यश मिळेल, असे काँग्रेसला वाटते.


आजारी मनीष तिवारी निवडणूक लढवण्यास तयार
माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी लुधियानामधून निवडणूक लढवू शकतात, असे संकेत काँग्रेसने दिले आहेत. त्यांची प्रकृत्ती उत्तम असल्याचे सरचिटणीस शकील अहमद म्हणाले. त्यांनी कधीही निवडणूक लढवण्यास नकार दिला नाही. तिवारी यांना 15 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उधमपूरमधून गुलाब नबी आझाद निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांनी आधी संघटनात्मक काम करण्याची इच्छा जाहीर केली होती.


काँग्रेस केजरीवालांना पाठिंबा देणार नाही
मोदींना कोणत्याही परिस्थितीत वॉकओव्हर द्यायचा नाही, असा निश्चय काँग्रेसने केला आहे. या जागेवरून तगडा उमेदवार उभा करणार असल्याचे पक्षाने सांगितले. वाराणसीत पूर्ण शक्ती पणाला लावणार असल्याचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये अरविंद केजरीवाल यांना समर्थन देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.