Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | congress raised concerns about VBA

Election2019: लातूरमध्ये भाजप अन‌् काँग्रेसमध्ये चुरस, वंचित आघाडीने काँग्रेसची चिंता वाढवली

अनिल पौलकर | Update - Apr 16, 2019, 09:34 AM IST

लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारसे प्रभावशाली नाहीत

 • congress raised concerns about VBA

  लातूर- लातूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांतच लढत होत आहे. अंतिम टप्प्यात काँग्रेसने थोडा जोर वाढवल्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यातील मंत्र्यांच्या सभा आयोजित केल्या आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला अनुसूचित जातीमधील तरुणांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून काँग्रेसची चिंता चांगलीच वाढली आहे.


  लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, उदगीर, अहमदपूर आणि लोहा-कंधार हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यातील उदगीर, निलंग्यातून सर्वाधिक एक लाख मतांची आघाडी भाजप उमेदवाराला मिळवून देण्याचा विडा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी उचलला आहे. इतर मतदारसंघांतूनही जास्तीत जास्त भाजपला मतदान मिळावे यासाठी अख्खा भाजप कामाला लागला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार मूळचे उदगीर तालुक्यातील आहेत. त्यामुळे त्यांना त्या भागातून चांगली मते पडतील असा काँग्रेसजनांचा दावा आहे. त्यांना लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या मतदारसंघांची साथ मिळाली तर आपला पक्ष जिंकू शकतो, असे गणित काँग्रेसजनांकडून मांडले जात आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये काँग्रेस आणि भाजपत एकमेकांच्या नाकावर टिच्चून सभा घेतल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात प्रचारात पिछाडीवर असलेल्या काँग्रेसने दुसऱ्या टप्प्यात चांगलाच जोर लावला. त्यामुळे भाजपनेही सावध पवित्रा घेत केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या सभा आयोजित केल्या आहेत. नरेंद्र मोदींची औशात झालेली सभा भाजपला शक्ती देणारी ठरली. त्याला उत्तर म्हणून राहुल गांधींची सभा आयोजित करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील होती. परंतु नांदेडला एकच सभा होणार असल्यामुळे राहुल गांधींची सभा लातूरला होऊ शकणार नाही, असे
  सांगण्यात आले.


  फायदा भाजपला होणार
  लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारसे प्रभावशाली नाहीत. त्यांचा लोकांशी थेट संपर्क नाही. त्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही. परंतु अनुसूचित जातींमधील तरुणांनी या वेळी वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट चित्र आहे. उमेदवार कोण आहे हे न पाहता केवळ प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहायचे असे तरुणाईने ठरवले आहे. त्यामुळे ही मते आपलीच असे समजणाऱ्या काँग्रेसची चिंता कमालीची वाढली आहे. जेवढी मते वंचित आघाडीला मिळतील तेवढीच काँग्रेसची मते कमी होणार आहेत. याचा फायदा भाजपला होणार असून तेवढा एकच मुद्दा कळीचा असल्याचे दिसते आहे.

Trending