आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसकडे नेत्यांचा स्टॉक, पक्षांतर करून गेलेले प्रबोधन करून येतील ; सुशीलकुमार शिंदेंचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गळती लागली आहे. मात्र, आमच्याकडे नेत्यांचा भरपूर स्टॉक असल्यामुळे आमचे सेक्युलरवादी लोक तिकडे जात आहेत. मात्र, तिकडच्यांचे वैचारिक प्रबोधन करून आमचे लोक पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, असा दावा माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. पंढरपुरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपत प्रवेश केला असला तरी त्यांचे वडील आणि माढा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे अंत:करणातून राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबरच असल्याचा दावाही शिंदे यांनी केला. देशाचे स्वातंत्र्य कोणी मिळवले, देशाचा विकास कोणी केला व मागील पंचवीस वर्षांपूर्वी झालेल्या विकासाची माहिती युवकांना देणे गरजेचे आहे. कारण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत युवकांचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदा गाफील राहून चालणार नाही. कार्यकर्त्यांनी जागृत राहिले पाहिजे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.    

 

 


आम्ही लष्करी कारवायांचे कधी भांडवल केले नाही  
यूपीए सरकारच्या काळात पाकमधील दहशतवादी अड्ड्यावर  कारवाया करण्यात आल्या. मात्र आम्ही त्याचे राजकीय भांडवल केले नाही. थापा मारणाऱ्या मोदी सरकारविरोधात जनतेच्या मनात रोष असून तो मतदानादिवशी व्यक्त होईल, आपण मतदारसंघात फिरत असून आपल्याला चांगले वातावरण असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.    

 

 

आम्हालाच २४ जागा, आंबेडकरांना २२ कशा देणार?  
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. बाळासाहेब ऊर्फ प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत अनेक वेळा चर्चा केली, मात्र त्यांनी २२ जागा मागितल्या. काँग्रेसला मुळातच २४ जागा मिळाल्या आहेत. त्यातील २२ जागा बहुजन वंचित आघाडीला कशा देता येतील? त्यांची ही मागणी योग्य नव्हती. आंबेडकर सोलापूर लोकसभा निवडणूक लढवत असले तरी त्यांना दलित व मुस्लिमांची ६ हजारांपर्यंत मते मिळतील. यामुळे माझ्या मतांची थोड्याफार प्रमाणात विभागणी होईल, परंतु याचा मला जास्त फटका बसणार नाही, असे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...