नंदुरबारमध्‍ये काँग्रेसला खिंडार..भरत गावित अपक्ष लढणार, के.सी.पाडवींची वाढली डोकेदुखी

प्रतिनिधी

Mar 28,2019 02:14:00 PM IST

नंदुरबार- सलग आठ वेळेस काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेले माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. 30 मार्च रोजी त्यांनी नवापूर येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचा विचारविनिमयासाठी खास मेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्यामध्ये ते आपली भूमिका जाहीर करणार असून त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची डोकेदुखी देखील वाढणार आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲड. के. सी. पाडवी यांच्या बरोबरच भाजपाच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांनादेखील मोठे आव्हान उभे राहणार आहे. यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी कशा पद्धतीने मार्ग काढतात, यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तब्बल ५२ वर्षे खासदारकी करत असताना माणिकराव गावित यांनी निभावलेली पक्षनिष्ठा आणि सर्व घटकांशी प्रेमभाव जपून मतदारसंघाशी बांधलेली घट्ट नाळ लक्षात घेता त्यांचे समर्थन करणारा भलामोठा कार्यकर्ता वर्ग आहे. पक्षाने माणिकराव गावित यांच्या ऐवजी भरत गावित यांना उमेदवारी देऊन त्यांच्या या निष्ठेला व कार्याला न्याय दिला पाहिजे होता, अशी भावना या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

भरत गावीत यांना उमेदवारी नाकारल्यामुळे अन्याय झाल्याची भावना बनलेला हा समर्थकांचा समूह भरत गावीत यांना अपक्ष उमेदवारी करण्याचा आग्रह करीत आहे. परिणामी काँग्रेस पक्षाचे जाहीर झालेले उमेदवार ॲड. के.सी. पाडवी यांची एक मोठी फळी विभागली जाईल हे स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीत सुद्धा भाजपाचे आमदार डॉ.विजयकुमार गावित आणि खासदार डॉ. हिना गावित यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले आणि आतून खिंडार पाडायला उत्सुक असलेले कार्यकर्ते सुद्धा भरत गावीत यांच्या अपक्ष उमेदवारीला मजबूत करणार आहेत.

30 मार्चच्या मेळाव्यानंतर या अपक्ष उमेदवारी बद्दलचे चित्र स्पष्ट होईल. तथापि महाराष्ट्रात जागोजागी काँग्रेस पक्षाला खिंडार पडत असतानाच नंदुरबार जिल्ह्यातही काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार यात मात्र शंका राहिलेली नाही.

X
COMMENT