आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का.. राधाकृष्ण विखे-पाटलांच्या चिरंजिवांचा भाजपमध्ये प्रवेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अखेर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरची जागा मिळत नसल्याने अपेक्षेप्रमाणे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश झाल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची अहमदनगरमधून भाजपतर्फे लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचेही घोषित केले. खरे तर सुजय विखे पाटील यांनी रविवारीच आपण भाजपमध्ये मंगळवारी प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते.

 

राष्ट्रवादीने जागा सोडावी यासाठी दोन दिवस वाट पाहण्याची त्यांची तयारी होती परंतु राष्ट्रवादीने जागा न सोडल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. आपण विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नसून पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखेपाटील यांनी सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर बोलताना दिली.

 

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतरही जागा अदलाबदलीवरून दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु आहे. अहमदनगरची जागा सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसला मिळावी असे प्रयत्न सुरु होते. परंतु राष्ट्रवादी या गोष्टीला तयार होत नव्हती. सुजय विखे पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीला उभे राहायचे होते. खरे तर ते अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवू शकले असते परंतु त्यांना राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी हवी होती आणि यासाठी त्यांनी राधाकृष्ण विखेपाटील यांच्याकडे हट्ट धरला होता. राधाकृष्ण विखेपाटीलही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. दिल्लीला जाऊन त्यांनी राहुल गांधी यांची भेटही घेतली होती. सुजय यांनी भाजप प्रवेशासाठी मंगळवारचा मुहुर्त काढल्याने दोन दिवस वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु होते.

 

काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे अहमदनगरची जागा सोडावी अशी विनंती केली होती.स्वतः राहुल गांधी यांनीही सोमवारीच शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र राष्ट्रवादी जागा न सोडण्यावर ठाम राहिल्याने अखेर सुजय यांनी भाजप प्रवेश करीत आपली उमेदवारी पक्की केली.

सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखेपाटील राजीनामा देतील असे म्हटले जात होते. परंतु विखेपाटील यांनी, आपण राजीनामा देणार नसून पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे सांगितले. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय माझ्या मुलाचा असून मी त्याला भाजपमध्ये जा असे सांगितलेले नाही असेही विखेपाटील म्हणाले.

 

भाजप प्रवेशानंतर बोलताना सुजय विखेपाटील यांनी सांगितले, आज मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय घेतला त्याचा मला आनंद आहे. परंतु आई-वडिलांच्या विरोधात गेल्याचे दुःखही आहे. प्रवेश करण्यापूर्वी सकाळी वडिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झाला नाही. माझ्या अडचणीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला खूप मदत केली त्यामुळे अडचणीत मदत करणा-यांच्या  सोबत मी जात आहे. माझ्या भाजप प्रवेशावेळी माझी बहिण आणि पत्नी सोबत होती. त्यांचा मला आधार आहे असेही सुजय विखे यांनी सांगितले.

 

जोरदार शक्तिप्रदर्शन

सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले. विखे-पाटील यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. नगरच्या विखे-पाटील यांची नवी पिढी आता भाजपत गेली आहे.

 

कुठे आहेत राधाकृष्ण विखे-पाटील?

राधाकृष्ण विखे-पाटील सध्या दिल्लीत असून ते सायंकाळी मुंबईत पोहोचतील अशी माहिती मिळाली आहे. सुजय यांनी वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

शरद पवार म्हणाले होते..सुजय विखे यांचं महाआघाडीत योगदान काय?

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नगरची जागा सोडण्याबाबत विनंती केली होती. सुजय विखे यांचं महाआघाडीत योगदान काय? असा सवाल खुद्द शरद पवार  उपस्थित केला होता. त्यामुळे सुजय यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
बातम्या आणखी आहेत...