जड वाहतूक बंदीसाठी काँग्रेसचा ठिय्या, प्रशासनाचे बैठकीचे तुणतुणे, पाच वर्षात २५ हून अधिक बळी
शहरातील जड वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात यावी, अशी मागणी करत आमदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी शांती चौका
-
सोलापूर - शहरातील जड वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात यावी, अशी मागणी करत आमदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी शांती चौकात भर पावसामध्ये घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, एक रुग्णवाहिका येताच, त्यास त्वरित वाट मोकळी करून दिली. शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदाेलनात भाग घेतला.
यावेळी शहरात येणारी जड वाहतूक सुमारे दोन तास बंद होती. यावेळी माध्यमांसमोर आमदार शिंदे म्हणाल्या, पोलिस आयुक्त व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नियोजन करून शहरातील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवावी. शहरातून जडवाहतुकीला बंदी घालावी. येत्या काही दिवसांमध्ये त्यावर त्वरित ठोस उपाययोजना न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनास दिला.
आंदोलनात नगरसेवक चेतन नरोटे, रियाज हुंडेकरी, बाबा करगुळे, गणेश डोंगरे, विवेक कन्ना, प्रशांत पल्ली, भीमाशंकर टेकाळे, कोमारो सय्यद, तिरुपती परकीपंडला व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.अनेक वर्षांपासून नाही काम
जड वाहनांसाठी बायपास, रिंग रोड हाच पर्याय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यावर काम झालेले नाही. समस्या आता गंभीर रूप धारण करत आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन अतिक्रमण काढले पाहिजे. तसे होताना दिसत नाही. फूटपाथवरही मोठे अतिक्रमण दिसते. नागरिकांना रस्त्यावरून जावे लागते. ही समस्या दूर झाली पाहिजे.
- हरी गोडबोले, वाहतूक सल्लागार समिती सदस्यश्रद्धांजली सभा, सही मोहीम
जड वाहतूक मुक्त नागरी कृती समितीने मंगळवारी सकाळी १०.३० वाजता शांती चौक, पाणी टाकीजवळ श्रद्धांजली सभा व स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले आहे. बुधवारी सकाळी १०.३० वाजता धरणे आणि शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता शांती चौक येथेच मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी, कामगार, नोकरवर्ग, उद्योजक आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
नागरिकांनीही नियम पाळावेत
नागरिकांनी वाहन चालवताना मोबाइलवर बोलू नये. चुकीच्या दिशेने ये- जा करू नये. सिग्नलचे नियम पाळावेत. वाहतूक नियमांचे नियमित पालन केल्यास वाहतूक व्यवस्था सुधारण्यास हातभार लागेल. सिग्नल लागण्याआधी पुढे जाण्याची घाई करू नये.करणार संयुक्त कारवाई
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर येत्या दोन-तीन दिवसात आरटीओ आणि वाहतूक पोलिस संयुक्तपणे कारवाई करणार आहेत. चालकाने बॅच बिल्ला, ड्रेस कोड वापरावा, रिक्षाला मागे जाळी बसवून घ्यावी. चारपेक्षा जास्त प्रवासी घेऊ नये. प्रवासी दिसला की एकदम थांबू नये, असे सहायक आयुक्त शिंदे यांनी सांगितले.