आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाचे संकेत; राजीव सातव, पटोले, थोरात चर्चेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा निकाल मात्र लवकरच लागणार आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या जागी दुसरा चेहरा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा दुसरा चेहरा राहुल ब्रिगेडचे राजीव सातव, गडकरींसारख्या बलाढ्य नेत्याविरोधात झुंज देणारे नाना पटोले किंवा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यापैकी कुणाचा असेल याचाही निकाल लवकरच लागणार आहे.
ही निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक उमेदवारासोबतच पक्षाचे नेतृत्व करणाऱ्यांचीही परीक्षा होती. त्यामुळेच ऐन निवडणुकीत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची भाकरी फिरवण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला होता. हाच निर्णय राज्य पातळीवरही घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेससाठी अत्यंत अटीतटीच्या बनलेल्या या निवडणुकीत विरोधी भाजप असो वा राष्ट्रवादीसारखा मित्र पक्ष असो, राज्यात आक्रमक प्रचाराचा धुरळा उडवून देण्यात चव्हाण कमी पडले. आधी नांदेडचे तिकीट आणि नंतर नांदेडमधील प्रचारात ते अडकून पडले. त्यात आदर्श घोटाळ्याची टांगती तलवार आणि तणावग्रस्त चेहरा यामुळे ते निवडणूक काळात पक्ष संघटनेत स्फूर्ती आणू शकले नाहीत. उलट, विरोधी पक्षनेत्यासारख्या जबाबदारीच्या नेत्याची बंडाळी ते रोखू शकले नाहीत. भाजपच्या आक्रमक प्रचारास प्रत्युत्तर देण्यात त्यांचे नेतृत्व मवाळ ठरले. या पार्श्वभूमीवर, लवकरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.


अशोक चव्हाण यांच्याकडून प्रदेश काँग्रेसची सूत्रे सातव, पटोले किंवा थोरात यांच्या हातात जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सातव हे राहुल गांधींचे निकटवर्तीय आहेत. गुजरात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे ते प्रभारी होते. तरुण चेहरा, सौम्य व्यक्तिमत्त्व आणि कोणत्याही घोटाळ्याचा डाग नसणे या यांच्या जमेच्या बाजू आहेत, तर मोदींच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणारे नाना पटोले यांच्या आक्रमक शैलीमुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे. स्वत:चा सुरक्षित मतदारसंघ सोडून केवळ पक्ष नेतृत्वाच्या सूचनेवरून त्यांनी नितीन गडकरींविरोधात लढत दिली. याची परतफेड प्रदेशाध्यक्षपदाची माळ घालून पक्ष करू शकतो. 


बदलावर शिक्कामोर्तब
थोरात यांनादेखील गुजरात विधानसभा निवडणकीपासून राहुल गांधींच्या वर्तुळात प्रवेश मिळाला आहे. प्रचारादरम्यान उशीर झाला, तेव्हा राहुल यांनी थोरातांच्या घरी मुक्कामही केला. विखेंच्या भाजप प्रवेशाने थोरात यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची केली. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखेंवर कारवाई न केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जाहीर टीका केली होती. तूर्तास, देशात सत्ताबदल होणार की नाही यावर बरेच खल सुरू असले तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मात्र सत्ता परिवर्तन करण्यावर पक्ष नेतृत्वाने शिक्कामोर्तब केल्याचे सूत्रांनी सांगितले.