आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल ६४ हजार कोटी खर्चूनही सिंचनात वाढ नाही; चौकशी आयोग नेमण्याची काँग्रेसकडून मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या चार वर्षांत ६४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करूनही राज्याच्या सिंचन क्षमतेत काहीच वाढ झाली नाही. हा फडणवीस सरकारचा सिंचन घोटाळाच आहे, असा आरोप करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी केली आहे. 


केंद्र सरकारनेच नेमलेल्या १५व्या वित्त आयोगाने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबाबत नोंदवलेल्या निरीक्षणावर बोलताना चव्हाण म्हणाले की, वित्त आयोगाची निरीक्षणे राज्य सरकारला आरसा दाखवणारी आहेत. भाजपच्या कार्यकाळात महाराष्ट्र गाळात चालला आहे, हे स्पष्ट दिसत आहे. २०१३-१४ पर्यंत राज्यावर जवळपास २ लाख ६९ हजार ३४५ कोटी रुपयांचे कर्ज होते. राज्य स्थापनेपासून ५४ वर्षांत हे कर्ज घेतलेले होते. परंतु भाजपच्या काळात मागच्या चार वर्षांत या सरकारने दुप्पट कर्ज घेतले आहे. आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादी) सरकारच्या काळातील तथाकथित सिंचन घोटाळ्याबाबत बैलगाडी भरून पुरावे देणाऱ्या भाजप नेत्यांनी गेल्या साडेतीन वर्षांमध्ये सिंचन प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या (सुप्रमा) आधारेच तब्बल ६४ हजार ३६४ कोटी रुपये खर्च केले आहेत. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील सुधारित प्रशासकीय मान्यतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजपच्या कार्यकाळात एवढ्या मोठ्या प्रमाणात सुप्रमा देण्यात येऊनही राज्यातील सिंचन क्षमतेत वाढ झाली नाही, हा वित्त आयोगाचा निष्कर्ष सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा असल्याचे चव्हाण म्हणाले. 


आमच्या वेळी घोटाळा, तुमच्या वेळी नाही का? 
आघाडी सरकारवेळचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार हजारो कोटी खर्च होऊनही सिंचनात वाढ न होणे हा घोटाळाच होता. तर, मग भाजपच्या काळातही ६४ हजार कोटी खर्चूनही सिंचनात काहीच वाढ का झाली नाही? तुमचा हा सिंचन घोटाळा नाही काय, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...