सत्ता संघर्ष / सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेचा प्रस्ताव आल्यावर विचार करू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचे सुचक विधान

'आम्ही एकत्र राहून विरोधी पक्षात बसू, पण शिवसेनेसोबत जाणार नाही'- शरद पवार

दिव्य मराठी वेब टीम

Oct 25,2019 07:18:00 PM IST

मुंबई- राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सर्वांचेच लक्ष्य सत्ता स्थापनेकडे आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्ता स्थापन करू शकणार नाही, पण त्यांनी भाजप शिवसेनेला चांगलाच घाम फोडला. निवडणुकीत काँग्रेसने 44 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या. निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि संगमनेर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी "सरकार स्थापनेसाठी जर शिवसेनेचा प्रस्ताव आता तर त्यावर विचार केला जाईल", असे वक्तव्य केलं आहे.


पत्रकार परिषदेत बोलताना थोरात म्हणाले की, "सरकार स्थापनेसाठी सध्यातरी आम्हाला शिवसेनेकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. पण, जर शिवसेनेचा प्रस्ताव आला, तर आम्ही विचार करू शकतो. वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल." यावेळी त्यांनी भाजपवर निशाना साधत सेनेबद्दल आपला पुळका दाखवला. ते म्हणाले, "भाजपने गेली 5 वर्षे शिवसेनेला कसाप्रकारे वागवलं, ते शिवसेनेला माहीत आहे. म्हणून आता त्यांनी हे ठरवायचं आहे, की पुढे काय करायचं", असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.


एक्झिट पोल एजन्सींनी माफी मागावी

बाळासाहेब थोरातांनी एक्झिट पोलवरही निशाणा साधला. "जे अशोक चव्हाण एक लाख मताधिक्क्याने जिंकून आले, ते हरणार असल्याचं दाखवण्यात आले होते. त्यामुळे त्या सर्व एजन्सीनी माफी मागावी, या मताचा मी आहे. तसेच, प्रसार माध्यमांनी देखील काळजी घ्यायला हवी", असेही थोरात म्हणाले.

'आम्ही एकत्र राहून विरोधी पक्षात बसू, पण शिवसेनेसोबत जाणार नाही'- शरद पवार

कालच्या निकालानंतर काँग्रेस शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणार, अशा चर्चा रंगू लागल्या. पण, यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. शरद पवार म्हणाले की, "आम्ही एकत्र राहून विरोधी पक्षात बसू, पण शिवसेनेसोबत जाणार नाही. त्यांच्यासोबत जाण्याचा काही संबंध नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कायम एकत्र राहील. आम्ही एकत्र राहून महाराष्ट्राचे प्रश्न मांडू. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न सोडवू. जनतेने आम्हाला विरोधी बाकात बसवले आहे, त्यामुळे आम्ही विरोधक म्हणून भूमिका मांडत राहू.", असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

X
COMMENT