आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - लढाऊ विमान राफेलच्या हजारो कोटी रुपयांच्या सौद्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून त्याच्या तपासासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. अन्यथा देशभरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. काँग्रेसचे मीडिया प्रभारी रणदीप सुरजेवाला शनिवारी पत्रकारांना म्हणाले, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे सरचिटणीस, प्रभारी, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष व आमदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली.
त्यात व्यापक चर्चा होऊन अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. राफेल सौद्यात भ्रष्टाचार झाला व 'चौकीदार भागीदार' बनले, असे बैठकीत राहुल यांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती काँग्रेसने देशाला दिली पाहिजे. जनतेला त्याबाबत जागृत केले पाहिजे, असे राहुल यांनी सुचवले. त्यानंतर राफेल सौद्यात भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रव्यापी आंदोलन चालवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हे आंदोलन जिल्हा स्तरापासून प्रादेशिक पातळीपर्यंत एक महिना चालवले जाणार आहे. त्यात मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला जाणार आहे. राफेल सौद्याच्या स्वतंत्र चौकशीसाठी जेपीसीची तत्काळ स्थापना करण्याची पक्षाची मागणी असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. काँग्रेसने भाजपवरील टीका गेल्या दोन वर्षांपासून जास्त वाढवली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात जाणार
काँग्रेसचे केंद्रीय नेते, प्रभारी व सरचिटणीस, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष, विधिमंडळ नेते प्रत्येक जिल्हा व प्रांतात जातील. लोकांना मोदी सरकारच्या राफेल घोटाळा तसेच इतर भ्रष्टाचाराबद्दलची माहिती देतील, असे काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.