आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'महापर्दाफाश सभांच्या' माध्यमातून काँग्रेस फडणवीस सरकारच्या 'महाजनादेश' यात्रेची 'पोलखोल' करणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि महापूरासारख्या आपत्तीत सापडलेले असताना आपत्तीग्रस्त जनतेला वाऱ्यावर सोडून पुन्हा निवडून यायचेच असा चंग बांधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत आहेत. काँग्रेस पक्ष राज्यभर महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणाची पोलखोल करणार असून 26 ऑगस्ट रोजी अमरावती येथे पहिली महापर्दाफाश सभा होणार आहे.

राज्याच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमूख आणि माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत होत असलेल्या या शुभारभांच्या सभेस ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधीपक्षनेते गुलाम नबी आझाद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आमदार के. सी. पाडवी, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, खादार बाळू धानोरकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अध्यक्षा चारुताई टोकस, युवक काँग्रेसचे प्रदाशाध्यक्ष सत्यजित तांबे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्यासह एनएसयुआय, अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि इतर विभागाचे अध्यक्ष काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवडणूक प्रचार समितीचे मुख्य समन्वयक आणि  प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी दिली आहे.
 
पहिल्या टप्प्यात  विदर्भातील  अमरावती,  वर्धा, चंद्रपूर,  गडचिरोली,  भंडारा, गोंदिया,  यवतमाळ,  वाशिम,  अकोला,  बुलढाणा या जिल्ह्यात विविध ठिकाणी महापर्दाफाश सभा होणार आहेत. पुढच्या टप्प्यात मराठवाडा,  पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , कोकण- मुंबई या विभागात सभा होणार आहेत. मोझरी - गुरूकूंज येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही प्रचंड विकास केला आहे, असे विधान करून 'वाद- विवादा' चे जाहीर आव्हान दिले होते. मुख्यमंत्र्यांचे हे आव्हान स्वीकारून दुस-याच दिवशीच प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले त्यांना जाहीर चर्चेसाठी तारीख, स्थळ आणि वेळ कळवण्याचे आव्हान दिले होते, हे प्रतिआव्हान न स्विकारता मुख्यमंत्र्यांनी 'पळ' काढल्यामुळे काँग्रेस पक्ष आणि निवडणूक प्रचार समितीने त्यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावरून 'महापोलखोल' सभा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या नियोजनानुसार राज्यभर या सभा होणार आहेत.