आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसचे बुडते जहाज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादे अजस्र जहाज बुडण्याची चिन्हे दिसू लागताच त्यावरील उंदीर सर्वप्रथम पटापट बाहेर उड्या मारतात, असे म्हणतात. पण, त्याच वेळी त्या जहाजाचे कॅप्टन आणि खलाशी शेवटच्या क्षणापर्यंत हिंमत न हरता जहाज किनाऱ्याला लावण्याची जिवापाड धडपड करत असतात. सध्या काँग्रेसच्या जहाजालाही घरघर लागली आहे. साहजिकच काँग्रेसच्या अंगाखांद्यांवर ज्यांच्या अनेक पिढ्या पोसल्या गेल्या, अशा अनेकांची ‘जनरेशन नेक्स्ट ’ नव्या डेकवर ‘सॉफ्ट लँडिंग’ करू पाहते आहे. हे बुडत्या जहाजाच्या कहाणीशी सुसंगत असले, तरी नेमक्या याच वेळी जहाजाचे कॅप्टन आणि खलाशीसुद्धा हातपाय गाळून बसले आहेत, हा दैवदुर्विलास म्हणावा.   सध्या महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका ऐन भरात आहेत. दाेन्ही राज्यांमध्ये काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे खरे तर काँग्रेसी नेतेमंडळींनी रात्रीचा दिवस करून निवडणुकीच्या कामाला लागणे गरजेचे होते. पण, ते राहिले दूरच, उलट पक्षाचे काही ज्येष्ठ नेते नैराश्याने ग्रासल्यागत जाहीर विधाने करत आहेत. काँग्रेसमध्ये उभी हयात काढलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी अशा वेळी ‘आम्ही आता थकलो आहोत’ हे जाहीरपणे केलेले वक्तव्य असो की सलमान खुर्शीद यांनी केलेली ‘आमचा नेता आम्हाला सोडून गेलाच’ अशी टिप्पणी असो, यातून ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची मानसिकताच उघड होते. तसे पाहता याअगोदरही अनेकांनी काँग्रेसबाबत अशा प्रकारचे मतप्रदर्शन केले. मध्यंतरी राजकीय विश्लेषक योगंेंद्र यादव यांनी, काँग्रेस आता संपली पाहिजे, असे म्हटले होते. अगदी मागे जायचे तर दस्तुरखुद्द महात्मा गांधी यांनीदेखील स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या परिस्थितीत काँग्रेसची किती गरज आहे, असा विचार बोलून दाखवला होता. अर्थात, तो संदर्भ वेगळा होता. पण अलीकडे अनेक मंडळी त्यांचे हे विधान ‘ट्विस्ट’ करून गांधीजींनीच काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता, असे उच्चरवाने सांगत असतात. मुद्दा हा की, १८८५ मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेसचे अस्तित्व टिकावे की नको? या प्रश्नातील काँग्रेसचा उल्लेख प्रतीकात्मक असून, त्यात अभिप्रेत आहे ते लोकशाहीचे अस्तित्व. कारण, पक्ष सत्तेत येतील आणि जातील, पण लोकशाही अबाधित राखायची असेल, तर कुणा एका पक्षाची मक्तेदारी होता कामा नये. यापूर्वीसुद्धा काँग्रेस पक्ष अनेकदा फुटला आहे. मात्र, तरीही तो आजच्यासारख्या दैन्यावस्थेत कधीच नव्हता. त्यामुळे सक्षम विरोधी पक्षाची पोकळी भरून काढण्यासाठी अन्य एखादा पर्याय पुढे येत नाही, तोवर तरी काँग्रेस तगलीच पाहिजे. अन्यथा अभिनिवेशी राजकारणाच्या लोंढ्यात काळ सोकावत जाईल. काँग्रेस पक्ष संपल्याने फरक काहीच पडणार नाही. मात्र, विरोधी अवकाश नष्ट होणे घातक आहे.

बातम्या आणखी आहेत...