आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची जाहिरात 'लय भारी', पण शिवसेनेचीच नक्कल करी!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : मराठमोळी वस्ती, भगवे झेंडे, भगवेधारी तरुण आणि नऊवारीत नाचणाऱ्या मुली... हे दृश्य दिसले तर नक्कीच अापल्याला ती मराठी माणसाचा मुद्दा उचलून धरणाऱ्या शिवसेनेची जाहिरात वाटेल. पण यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसनेही हा फंडा अात्मसात केलाय. काँग्रेसच्या प्रचारगीतातून आम आदमी' ची जागा हात लई भारी...' म्हणत नाचणाऱ्या तरुणांनी घेतली आहे. काँग्रेसच्या २:५१ मिनिटांच्या प्रचारगीताच्या शेवटी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे व बाळासाहेब थोरातांशिवाय एकाही नेत्याचा फोटो नाही. 'पहाटेचा सूर्य उगवताच भगव्याच्या मागे काैलारू घरांवर काँग्रेसचे झेंडे दिसतात. ढोलचा दणदणाट सुरू होतो. गुलाल उधळला जातो. निळा शर्ट, भगवे जॅकेट, त्यावर उडालेला गुलाल व गळ्यात काँग्रेसचा रुमाल घातलेला तरुण वाजवून टाकणार, गाजवून टाकणार' या गाण्यावर नृत्य सुरू करतो. लगेच भगव्या रंगाच्या नऊवारी साड्या आणि भगवे शर्ट घातलेले तरुण-तरुणी त्याच्या साथीला येतात. संपूर्ण वातावरण भगवे होऊन जाते. पुढे तरुणींच्या साड्यांचे रंग बदलतात, तरुणांचे शर्ट गुलाबी आणि फिकट हिरवे होतात. भगवा रंग मात्र शेवटपर्यंत कायम राहतो. काँग्रेसची ही जाहिरात शिवसेनेचीच अाठवण करून देते. गोरगरीब, दीनदुबळ्या जनतेचा पक्ष अशीच प्रतिमा अातापर्यंत काँग्रेसने समाेर अाणली, त्या दृष्टीने प्रचारही केला. २०१४ च्या विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण यांचा चेहरा घेऊन सरकारची स्वच्छ प्रतिमा मांडणारी जाहिरात या पक्षाने केली हाेती. दुसऱ्या एका जाहिरातीत शिवणयंत्रावर बसून मला विकासाची संधी दिली, त्यालाच मत करणार,' असे एक तरुणी सांगते. हर हाथ शक्ती हर हाथ तरक्की, काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ, अशा घोषणा जाहिरातीतून दिल्या जात होत्या. २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीतही काँग्रेसने गरिबी, झोपडपट्टी विकास, बेराेजगारी, पाणी प्रश्न, शेतकरी अशा प्रश्नांना जाहिरातीतून वाचा फोडली. मात्र त्याचा फारसा उपयाेग न झाल्याने अाता विधानसभेला आम आदमी'ला सोडचिठ्ठी देत सुरू झालेली काँग्रेस लई भारी' जाहिरात अनेकांच्या भुवया उंचावते.

हे तर बदललेल्या हवेचे प्रतीक
'काँग्रेसचा लय भारी' हा प्रचारपट उगवतीचे केशरी रंग घेऊन सुरू होतो व बव्हंशी त्याच रंगाची उधळण करत ढोलपथकाच्या ठेक्यावर नाचत-गात संपतो. छोटे गाव, मध्यमवर्गीय स्त्री-पुरुष, पाेपटी, निळा व गुलाबी झब्बा, दाढीवाला नेता, केशरी नऊवारीतील तरुणी ही प्रतीके दिसतात. शीख, मुस्लिम, पारशी, बौद्ध, गुजराती समाजघटक यात नाहीत. अन्य प्रचारपटात ते असतील. मात्र, हा जोशपूर्ण नक्कीच आहे. तेही बदललेल्या हवेचे प्रतीक! - प्रा.जयदेव डोळे, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक