आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन दरवाढीविराेधात काँग्रेसकडून अाज बंद; इतर पक्षांचाही पाठिंबा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सामान्य ग्राहक महागाईने हाेरपळून निघत असतानाही केंद्र सरकार काहीही उपाययाेजना करीत नाही. या निषेधार्थ काँग्रेस व मित्रपक्षांनी सोमवारी (दि. १०) सर्वपक्षीय देशव्यापी बंद पुकारला अाहे. या बंदमध्ये शहर व जिल्ह्यातही व्यापारी, व्यावसायिकांनी सहभागी हाेऊन व्यवहार बंद ठेवत सहभागी व्हावे, असे अावाहन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले अाहे. बंदच्या पूर्वसंध्येला काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाकपा, माकपा, शेतकरी कामगार पक्षासह मनसे पदाधिकाऱ्यांनी सहभागी हाेत बंदला पाठिंबा दिला. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांकडून कुठलीही सूचना न अाल्याने ते सुरू राहतील. 


सकाळी ६ ते सायंकाळी ४ या वेळेत जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असून सर्वच घटकांनी सक्रीय सहभाग नाेंदविण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे. सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचा समावेश जीएसटीमध्ये करून जनतेला दिलासा द्यावा, ही प्रमुख मागणी आहे. शहर व जिल्ह्यात व्यापाऱ्यांना या बंदसंदर्भात पत्रके वाटप करून आवाहन करण्यात आले आहे. काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, मार्क्सवादी, कम्युनिस्ट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मनसे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारिप, आरपीआय (गवई गट) या पक्षांसह विविध व्यापारी संघटना, कामगार संघटना, रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांनी पाठिंबा दर्शविला. शहर व जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी बंद शांततेच्या मार्गाने पाळण्याचे अावाहन जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील, शहराध्यक्ष शरद अाहेर, डाॅ. हेमलता पाटील, राष्ट्रवादीचे नाना महाले, रंजन ठाकरे, जयंत जाधव, माकपाचे डॉ. डी. एस. कराड, तानाजी जायभावे, सुनील मालुसरे, माजी महापाैर अशोक मुर्तडक, गजानन शेलार, राजू देसले, सय्यद अहमद, सलीम शेख यांनी केले आहे. 


पोलिस यंत्रणा सज्ज, अतिरिक्त बंदाेबस्त तैनात 
बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी तातडीची बैठक बोलवत मार्गदर्शन केले. उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे यांच्यासह सहायक आयुक्त बंदोबस्तात सहभागी होणार आहे. ३ उपायुक्त, ८ सहायक आयुक्त, ४५ पोलिस निरीक्षक, ५५ सहायक निरीक्षक, ९० उपनिरीक्षक यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी, १२ स्ट्रायकींग फोर्स, आरसीएफ, क्यूआरटी व एसआरपीएफ प्रत्येकी १ कंपनी, गुन्हे शाखा युनिट १ व २ अधिकारी व कर्मचारी, विशेष शाखा अधिकारी व कर्मचारी असा माेठा बंदोबस्त तैनात राहणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...