आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपायांवर विचार करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ दिवसांपासून देशातल्या अनेक चौकांत मेणबत्या लावल्या जात आहेत. श्रद्धांजली सभा होत आहेत. महिला  किती असुरक्षित आहेत, याची जाणीव होते आहे. वाहिन्यांवरचा प्राइम टाइम आणि वर्तमानपत्रातील रकाने यासाठी राखीव ठेवले आहेत. महिलांच्या अडचणींबाबत चर्चा सुरू आहेत. मात्र, फक्त दिल्लीतील निर्भयाचा आणि हैदराबादमधील डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतरच महिला सुरक्षेची जाणीव होते. अशा घटना देशात घडूच नयेत यासाठी किती प्रयत्न होतात? यावर कधीच काम होताना दिसत नाही. प्रॉब्लेमवरील चर्चांपेक्षा सोल्युशनवर का विचार होत नाही? हा मुद्दा दोन दिवसांपूर्वी दिव्य मराठीच्या कार्यालयात आयोजित टॉक शोमध्ये डॉ. निशिगंधा व्यवहारे या मानसोपचार तज्ञांनी मांडला

खरंच.. सात वर्षांपूर्वी दिल्लीत अशाच नराधमांनी निर्भयाचे लचके तोडत तिचा जीव घेतला. आराेपींना अटक करून सात वर्षे झाली तरीसुद्धा अजूनही फाशीच्या शिक्षेवर विचारमंथन सुरू आहे. कदाचित आत्तापर्यंत समाजाला धडा शिकवणारा निकाल जर समोर आला असता तर काम संपवून घरी जाणाऱ्या निष्पाप महिला डॉक्टरला थांबवण्याची हिंमत त्या चार नराधमांची झाली नसती. ही परिस्थिती बदलायला हवी. ही चर्चा कायम हाते. प्रत्यक्षात मात्र किती उपाययोजना मलात येतात? बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांकडे असे किती गुन्हे नोंदवले जातात? नोंदवलेल्या गुन्ह्यांचा तपास किती गांभीर्याने होतो, नियाेजित वेळेत दोषारोपपत्र दाखल होते का? युक्तिवादादरम्यान सरकारी पक्षाकडून किती भक्कमपणे पीडितेची बाजू मांडली जाते आणि किती प्रकरणांत गुन्हेगाराला शिक्षा होते? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, यात ठळक यश जर यंत्रणेला मिळाले असते तर अपहरण , विनयभंग, बलात्कार यांचा वाढता आलेख पाहायला मिळाला नसता. हे निश्चित आहे. 

हातातोंडाच्या गाठीसाठी...

दिव्य मराठीच्या या टॉक शोमध्ये पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या नंदाचा अनुभव डोळ्यात पाणी आणणारा आणि मनात चीड निर्माण करणारा आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या रांगेत बळजबरी घुसलेला तरुण पेट्रोल भरताना तिला तिचा मोबाइल नंबर मागतो.  फिरायला येते का, असे विचारतो तेव्हा तिच्या मनाची घालमेल शब्दांत मांडता येणं कठीण आहे. उघड्या डोळ्याने आणि बंद मनाने हा सगळा प्रकार तिला रोज निमूटपणे सहन करावा लागतो. कारण स्वत:च्या टिचभर पोटाबरोबर घरातील सदस्यांची हातातोंडाची गाठ घालण्यासाठी तरी तिला काम करावेच लागते. पोलिसांकडे गेलो तर नसती कटकट, नोकरी जाण्याची धास्ती तिला असते. सुदैवानं नंदा जिथे काम करते त्या पेट्रोल पंप मालकानं तिला रात्री घरापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याची व्यवस्था केलीय. मात्र त्यावरही समाजाच्या विचित्र नजरेला तिला सामोरं जावंच लागतं. 

मेट्रो सिटीतली श्वापदं...

फक्त झोपडपट्टीत किंवा गरीब वस्तीतच अशा प्रकारचे गुन्हेगार तयार हाेतात असे नाही. तर श्रीमंत आणि मेट्रो सिटीतही घराघरांमध्ये ही श्वापदं आहेत. हे आत्तापर्यंत घटनांनंतर समोर आलेच आहे. त्यामुळे आपापल्या परीने ही परिस्थिती बदलण्यासठी पावले उचलणे गरजेचे आहे. औरंगाबादच्या रिक्षाचालकांनीही हैदराबादच्या घटनेनतंर दिव्य मराठीच्या व्यासपीठावर एकत्र येत महिला सुरक्षेसाठी पुढाकार घेतला. आमच्या रिक्षात महिला सुरक्षित राहतीलच, मात्र शहरात कुठेही असे प्रकार दिसल्यास आम्ही याकडे दुर्लक्ष करणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली. त्यांच्या या पावलावर आपणही पाऊल टाकूयात का...? 

मग गुन्ह्यांचीही तुलना करा...

पाश्चिमात्य देशांत स्वैराचार आहे. मुलींना आणि महिलांना गरजेपेक्षा अधिक स्वातंत्र्य दिले आहे, अशी चर्चा नेहमी होते. त्यावर टीकाही केली जाते.  मात्र या देशातील बलात्कारांची आकडेवारी भारतापेक्षा निश्चितच कमी आहे. मग तुलनाच करायची तर या मुद्द्यावरही का केली जाऊ नये? एक तर बलात्काऱ्यावर वचक बसेल असा कडक कायदा तरी करा किंवा आपला समाज तरी तेवढा प्रगल्भ करा. मात्र या दोन्ही पातळ्यांवर होणारे काम हे किती तोकडे आहे. त्यामुळे देवी म्हणून पुजल्या जाणाऱ्या याच देशात सर्वाधिक महिला अत्याचाराचे आणि बलात्काराचे गुन्हे घडतात. यापेक्षा दुर्दैव ते काय? 

लेखकाचा संपर्क : ९९२२९९४३२६