आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफी, वीज बिल माफीचाही विचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा अद्याप अंतिम झालेला नसला तरी काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, मर्यादित वीज बिलमाफी, तरुणांना मासिक रोजगार भत्ता तसेच अनुसूचित जाती, जमातींच्या धर्तीवर ओबीसींना १०० टक्के शिष्यवृत्तीचे आश्वासन देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसच्या जाहीरनामा समितीत मुद्द्यांवर खल सुरू आहे. समितीची बैठक उद्या सोमवारी होणार आहे. त्यात जाहीरनाम्यात नेमक्या कोणत्या घटकांना प्राधान्य द्यायचे आणि कुठली आश्वासने द्यायची, यावर निर्णय होणार आहे. समितीच्या यापूर्वीच्या बैठकांमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर विचार झाला असून शेतकरी, बेरोजगार तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी काही घोषणांचा विचार काँग्रेसमध्ये सुरू आहे.

शेतकऱ्यांसाठी
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा मुद्दा जाहीरनाम्यात राहण्याची दाट शक्यता समितीतील नेत्यांकडून बोलून दाखविली जात आहे. याशिवाय शेतकऱ्यांना तीन अश्वशक्तीपर्यंत मोफत वीजेचे आश्वासन देता येईल काय, यावर विचार सुरू आहे.

ओबीसीसाठी
अनुसूचित जाती आणि जमातीच्या धर्तीवर ओबीसींना १०० टक्के शिष्यवृत्ती तसेच बारावीऐवजी पदवीपर्यंतचे शिक्षण क्रीमिलेअरची अट लागू करून मोफत ठेवता येईल काय, यावर गांभीर्याने विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचा जाहीरनामा अाज प्रकाशित हाेणार
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा २३ सप्टेंबर राेजी दुपारी २ वाजता मुंबईत प्रकाशित करण्यात येणार अाहे. दुपारी दाेन वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम हाेणार अाहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार अाहेत. राष्ट्रवादीचा जाहीरनामाही शेतकरी केंद्रीतच असणार असे, पक्षातून सांगण्यात अाले.

तरुणांसाठी
बेरोजगारीमुळे तरुणवर्गातील असंतोष पसरत चालला आहे. हे लक्षात घेऊन अशा तरुणांना किमान तीन हजार रुपये बेरोजगार भत्ता देता येईल का, या मुद्द्यावरही काँग्रेसमध्ये आकडेमोड सुरू असल्याची माहिती समितीतील सूत्रांनी दिली.

उद्योगांसाठी
राज्यातील ५२ टक्के उद्योग बंद अवस्थेत असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. या उद्योगांना चालना देऊन रोजगार वाढविण्याच्या दृष्टीने देखील जाहीरनाम्यात काही आश्वासनांचा समावेश राहील, असेही पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...