Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Consolation of suryakant patils Family

मुस्तीत आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन, मदतीचे मंत्र्यांचे आश्वासन

प्रतिनिधी | Update - Aug 04, 2018, 10:52 AM IST

मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथील सूर्यकांत महादेव पाटील यांनी दीड लाखाच्या कर्जापोटी मंगळवारी विष पिऊन आत्महत्या केली.

 • Consolation of suryakant patils Family

  सोलापूर- मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथील सूर्यकांत महादेव पाटील यांनी दीड लाखाच्या कर्जापोटी मंगळवारी विष पिऊन आत्महत्या केली. कारखान्याकडून उसाचे बिलही वेळेवर मिळत नाही, यामुळे कर्ज कसे फेडायचे ? ही िचंता असल्याने आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. शुक्रवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. पालकमंत्री यांनी तातडीने शासकीय मदत देण्याचे आश्वासन दिले.


  उसाचे बिल वेळेत न मिळणे, कौटुंबिक प्रश्न यामुळे पाटील यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले व नातवंडे आहेत. दोन मुले पुणे येथील खासगी कंपनीत काम करतात तर एक मुलगा शेती करतो. सिद्धेश्वर कारखान्यास मागील हंगामात ऊस गेला होता. कारखान्याने तीन महिने हेलपाटे मारूही बिल न दिल्याने सूर्यकांत पाटील यांनी आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद होते. पालकमंत्री यांनी कारखाना प्रशासनाविरोधात ऊसबिलाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासही सांगितले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांनीही पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन कारखान्याकडील थकीत ऊसबील, शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सिद्धेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष दीपक आलुरे यांनीही पाटील कुटुंबीयांची भेट घेतली.


  बैठक बोलावण्याचे नाहीत अधिकार : जिल्हाधिकारी
  जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी थकीत ऊस बिलाबाबत कारखान्याची बैठक बोलावणे माझ्या कार्यक्षेत्रात येत नाही. याबाबत जिल्हा उपनिबंधक, प्रादेशिक सहसंचालक यांना सूचना देऊ शकतो. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत मिळवून देऊ, शिवाय ऊस बिल न मिळाल्याने साखर आयुक्तांना अहवाल सादर करू. पण यापूर्वी ऊसदराचा तिढा सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कारखाना प्रतिनिधी व संघटनेची बैठक बोलाविली होती.


  करणार घंटानाद आंदोलन
  कारखानदारांनी सात दिवसांच्या आत थकीत ऊसबील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. थकीत ऊसबिलापोटी १० ऑगस्ट रोजी सिद्धेश्वर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या घरासमोर तर १३ ऑगस्ट रोजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे श्री. पटेल यांनी सांगितले. पाटील यांनी ३० जुलै रोजी आत्महत्या केली, पण त्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी तहसीलदार कदम फिरकलेच नाहीत. ३ ऑगस्ट रोजी मंत्री येणार असल्याने तहसीलदार कदम व प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी भेट दिली. जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार कदम यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना िदलेल्या निवेदनात केली आहे.


  २१ कारखान्यांकडे १८७ कोटी थकीत...
  चालू हंगामातील जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांकडे १८७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये सिद्धेश्वर कारखान्याकडे ५० कोटी, गोकुळ कारखान्याकडे २२ कोटी, मातोश्री कारखान्याकडे १६ कोटी, सासवड माळी शुगर्सकडे १२ कोटी, लोकमंगल कारखान्याकडे १० कोटी रुपयांचा समावेश आहे. इतर कारखान्याकडे १ कोटी ते ५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. २०११-१२ ते २०१६-१७ या पाच वर्षात जिल्ह्यातील चार कारखान्यांकडे ८१ कोटी रुपये थकीत आहेत. यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ कारखान्याकडे ९ कोटी ७ लाख, शंकर सहकारी साखर कारखान्याकडे ३० कोटी ७६ लाख तर आर्यन शुगरकडे २१ कोटी ०५ लाख तर विजय शुगर्सकडे २० कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे. साखर आयुक्तांनी जमीन महसूल अधिनियमानुसार कारवाई करूनही शेतकऱ्यांची ऊसबिले वसूल झाली नाहीत.
  प्रतिनिधी


  चिठ्ठीतील मजकूर...
  ओम गणेशाय... ओम श्री साईराम तीन महिने कारखाना बिल देत नाही, शेतात खत घालायचे राहिले आहे. एप्रिलमध्ये लहान मुलाचे लग्न झाले आहे. हातात एक पैसा नाही. माझ्या मिसेसला दवाखान्याचा खर्च होत आहे. जागोजागचे पैसे द्यायचे आहेत. घरखर्च, लाइट बिल आणि भावाच्या मुलीचे लग्न आले. या गोष्टीचा विचार करून मी स्वत: आत्महत्या करीत आहे. माझे कोणावरही आरोप नाही. कळावे... -पाटील एस. एम.

Trending