Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | constitution will not change; Union Minister Ramdas Athavale

काँग्रेस लोकांना भडकवते, संविधान बदलणार नाही!; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

प्रतिनिधी | Update - Aug 27, 2018, 11:04 AM IST

केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष हे देशाची राज्यघटना बदलण्याचा किंवा आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न करत नाहीत.

 • constitution will not change; Union Minister Ramdas Athavale

  सोलापूर- केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष हे देशाची राज्यघटना बदलण्याचा किंवा आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न करत नाहीत. काँग्रेस पक्षाकडून समाजबांधवांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.


  हुतात्मा स्मृती मंदिरात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाने प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे यांचा एकसष्टी अभीष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात श्री. आठवले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआय राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंग होते. याप्रसंगी माजी आमदार अनिल गोंडाणे, प्रदेश युवक अध्यक्ष पप्पू कागदे, भीमराव सातवकर, मुंबई प्रदेशाध्यक्ष गौतम सोनवणे, सरचिटणीस असित गांगुर्डे, राजा सरवदे, मंदाकिनी सरवदे, के. डी. कांबळे, राहुल सरवदे, सुबोध वाघमोडे, अशोक सरवदे, राजरत्न इंगळे आदी उपस्थित होते.


  जो कोणी संविधान बदलेल त्याचे तोंड फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान मोदी म्हणतात, संविधान बदलण्याचा विषयच नाही. अमित शहा म्हणतात, दलितांच्या आरक्षणास पाठिंबा आहे. अॅट्रॉसिटी अॅक्ट संबंधित उलट-सुलट चर्चा होती.


  उलट सरकारने कायदा कडक केला. भविष्यात आरपीआयची एकसंध ताकद निर्माण करण्याची गरज आहे. फक्त तोंडाने बोलून निळा झेंडा फडकणार नाही. त्यासाठी एकोप्याने काम केल्याने आमदार व खासदार निवडून येतील. नियोजनबद्ध काम करावे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बहुजनांचा असून, सगळ्यांना बरोबर घेऊन पक्ष व्यापक करावा लागेल, असे आवाहन श्री. आठवले यांनी केले. राजा सरवदे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला.


  भीमा कोरेगावप्रकरणी मला बदनाम केले गेले
  भीमा काेरेगावच्या प्रकरणात मला बदनाम केले. या प्रकरणात सरकारचा काहीच संबंध नव्हता. सवर्ण समाजातील लोकांनी दगडफेक केली. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यास विविध संघटना व कार्यकर्ते यांना मीच सांगितले होते. कारण सत्तेत मंत्री असल्यामुळे मला प्रत्यक्ष सहभाग घेता येत नव्हता. मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी पुकारलेला बंद हा समाजाच्या हिताचा होता. समाज एकत्र आल्याने काय होऊ शकते, हे दाखवून दिले आहे. या बंदच्या काळातही आरपीआय सगळ्यात पुढे होता.

Trending