आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधानाला न बदलता संविधानिक मूल्यांची पायमल्ली : डॉ. कोत्तापल्ले

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • प्रगतिशील लेखक संघाच्या चौथ्या राज्य अधिवेशनात प्रतिपादन

अमरावती- संविधानाला न बदलता संविधानिक मूल्यांची सरकारकडून पायमल्ली केली जात असल्याचे प्रतिपादन मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. प्रगतिशील लेखक संघाच्या अमरावतीतील अग्रसेन भवन येथील चौथ्या अधिवेशनाच्या उद््घाटनीय सत्राच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. कोत्तापल्ले रविवारी (दि.२२) मार्गदर्शन करत होते.पुरातन काळापासून या देशात ब्राह्मण संस्कृती आणि श्रमण संस्कृती असा संघर्ष सुरू अाहे. देशात अनेकदा क्रांती आणि प्रतिक्रांती घडली आहे. १९२५ पासून देशामध्ये तीन प्रमुख विचारांचे प्रवाह कार्यरत झाले. १९२५ मध्येच ब्राह्मणेतर काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. देशामध्ये महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक समतेची चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ अशा परिवर्तनाच्या चळवळींनी देशामध्ये वाटचाल केली. त्याच वेळी देशातील सनातन, कर्मठ रूढी-परंपरावादी व वर्चस्ववादी विचारांनी संघटित होण्याचे व पुरोगामी चळवळीला प्रतिकार करण्याचे काम केल्याचे कोत्तापल्ले म्हणाले. स्वातंत्र्यानंतर भारतीय संस्कृतीत व सर्वसामान्य शोषित पीडित समाजाच्या कल्याणाचा घटनेमध्ये अंतर्भाव करून राज्यघटना अस्तित्वात आली. त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या संविधानामध्ये भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब नाही व ती काहीच कामाची नाही, असे सांगून घटनेला गोधडी संबोधले होते. त्यानंतर ज्यांचा राज्यघटनेवर विश्वास नाही, अशा लोकांच्या हातात देशाची सत्तासूत्रे असल्यामुळे ते गोळवळकरांचा “दी बंच ऑफ थॉट’’ यातील विचारांवर आधारित भारत घडवण्याचा प्रयत्न केला जात अाहे. त्यातूनच देशामध्ये सध्या विभाजनाची, असंतोषाची व अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा भारतीय फॅसिझम नव्या स्वरूपाचा असून मानवजातीला कल्याणकारी ठरणारा नाही, असे कोत्तापल्ले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की, कितीही चांगली राज्यघटना निर्माण केली तरी ती अमलात आणणारे लोक जर नालायक असतील तर ती राज्यघटना अयशस्वी ठरेल. त्यामुळे ज्यांचा संविधानावर विश्वास नव्हता त्याच लोकांच्या हातात संविधान राबवण्याची जबाबदारी असल्याने ते प्रामाणिकपणे संविधानाची अंमलबजावणी करतील, असा विश्वास ठेवण्याची परिस्थिती नाही. सध्याचा काळ पुरोगामी व प्रगतिशील लेखक, कलावंत, कार्यकर्त्यांसाठी आव्हानाचा कठीण असला तरी चळवळीला पुढे नेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. लेेखकांनी पुरोगामी विचार निर्माण करून हे विचार सर्वसामान्य जनतेसाठी आहेत, याची प्रचिती आणून देण्याची गरज असल्याचे कोत्तापल्ले म्हणाले. 

प्रसिद्ध सिने अभिनेते तथा लेखक वीरा साथीदार यांच्या हस्ते उद््घाटन पार पडले, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रलेसंचे राष्ट्रीय सचिव हिंदी साहित्यिक विनीत तिवारी यांनी बीजभाषण केले. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक उषा आठल्ये, जी. के. ऐनापुरे, काॅम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कारप्राप्त शाहीर शीतल साठे, अमरावती जिल्हाध्यक्ष डॉ. काशिनाथ बऱ्हाटे व्यासपीठावर उपस्थित होते. 

कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार प्रदान

या संमंलनाच्या औचित्याने विद्रोही शाहीर शीतल साठे यांना काॅम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक तथा समीक्षक जी. के. ऐनापुरे यांच्या हस्ते तसेच छत्तीसगड येथील प्रसिद्ध हिंदी अनुवादक उषा आठल्ये-वैरागकर यांची प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
 

बातम्या आणखी आहेत...