राजधानी दिल्लीच्या तुलनेत / राजधानी दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दुप्पट महाग, युनिट स्लॅबमध्ये घट केल्यास ग्राहकांना वीज मिळेल 50 टक्के स्वस्त

प्रतिनिधी

Nov 10,2018 10:39:00 AM IST

औरंगाबाद - राजधानी दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दुप्पट महाग अाहे. भारनियमनाचा त्रास सहन करूनही राज्यातील वीज ग्राहकांना महागडी वीज खरेदी करावी लागत अाहे. मात्र दिल्लीप्रमाणे राज्यातही युनिट स्लॅबमध्ये वाढ केल्यास राज्यातील अडीच कोटी घरगुती वीज ग्राहकांना ५० टक्के स्वस्त उपलब्ध होऊ शकते, असे ‘दिव्य मराठी’ ने केलेल्या अभ्यासांती स्पष्ट झाले.


दिल्लीत आम आदमी पार्टी सत्तेवर येताच केजरीवाल सरकारने जनतेला स्वस्तात वीज देण्याचे अाश्वासन पूर्ण केले. त्या वेळी देशभरात त्याची चर्चा झाली. केजरीवाल सरकारने हे आश्वासन कसे पूर्ण केले आणि दिल्ली सरकार स्वस्त वीज देऊ शकते तर महाराष्ट्र सरकार का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि महाराष्ट्रातील वीज दर आकारणीची तुलना केली असता आकारणीच्या पध्दतीत बदल केल्यास महाराष्ट्रातही वीज दर ५० टक्के स्वस्त होऊ शकतात असे दिसून आले. महाराष्ट्राच्या तुलनेत दिल्लीमध्ये युनिट स्लॅब दुपटीने जास्त आहे व युनिट दर दीड ते दुप्पट अधिक आहे. त्याचा तेथील ग्राहकांना फायदा होतो तर महाराष्ट्रातील अडीच कोटी ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे असे दिसून आले.

महाराष्ट्र घरगुती ग्राहक
० ते १०० युनिट ४.३० रुपये, १०१ ते ३०० युनिट ८.०३ रुपयेे, ३०१ ते ५०० युनिट ११.०५ रुपये, ५०१ ते १ हजार युनिटसाठी ११.८० रुपयेे, १ हजार युनिटच्या पुढे १२.८० रुपये, तसेच सिंगल फेज ८० तर थ्री फेजसाठी ३०० रुपये फिक्स चार्जेस लागतात. सबसिडी मिळत नाही. १० किलो वॅटच्या पुढे वीज वापर असेल तर १८५ रुपये वॅट फिक्स चार्जेस लागतात. वेळेत वीज बिलाचा भरणा केला नाही तर व्याज, विलंब शुल्क आणि विविध अधिभार भरावे लागतात.

काय आहे दिल्ली पॅटर्न
दिल्ली सरकारने ४०० युनिटपर्यंत ५० टक्के सबसिडीची तरतूद केली. म्हणजेच २०० युनिटसाठी ३ रुपयेप्रमाणे ६०० रुपयांपैकी ग्राहकांना केवळ ३०० रुपये द्यावे लागतात. २०१ ते ४०० युनिट ४.५० रुपये दर असून ५० टक्के सवलत मिळते, ४०१ ते ८०० युनिटसाठी ६.५० रु. पैसे, ८०१ ते १२०० सात रुपये, १२०० पुढे ७.७५ रु. आकारले जातात. २ किलोवॅटसाठी १२५ रुपये फिक्स चार्जेस, २ ते ५ किलोवॅटसाठी १४० रुपये प्रतिकिलो वॅट दर आकारले जातात.

आपल्याला हे करावे लागेल
दिल्ली व महाराष्ट्रातील वीज दर आकारणीचा तुलनात्मक अभ्यास केला असता महाराष्ट्रात वीज आकार खूप किचकट असल्याचे स्पष्ट होते. आकारणीच्या पध्दतीमुळे वीज अभियंतेदेखील हैराण आहेत. शिवाय वीज दर कमी करण्याऐवजी ते वाढवण्यात येत असल्याने ग्राहक रोष व्यक्त करत असल्याचे स्पष्ट होते. याचा विचार केला तर महाराष्ट्रात युनिट दर नव्हे, तर स्लॅब वाढवण्याची नितांत गरज आहे. सध्या १०१ युनिट झाल्यास ४ रुपये ३० पैसेऐवजी दुप्पट म्हणजे ८ रुपये ३ पैसे प्रमाणे वीज बिल अदा करावे लागत आहे. २०० युनिटचा स्लॅब झाला तर ४ रुपये ३० पैसे प्रमाणे बिल भरावे लागेल त्यामुळे आपोआपच वीज बिलात ५० टक्के स्वस्त होईल. महाराष्ट्रात युनिट स्लॅब वाढवून त्यावर सबसिडी दिल्यास लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकेल. याकडे महावितरण, वीज नियामक आयोग व महाराष्ट्र ऊर्जा मंत्रालयाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

X
COMMENT