आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक : आत्महत्येचा 'संदर्भ' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांतील नागरिकांच्या आरोग्याचे दायित्व नाशिकस्थित ज्या संदर्भ रुग्णालयाकडे जाते त्याच रुग्णालयाच्या अनारोग्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, नाशिकच्या विभागीय संदर्भ रुग्णालयात आजवर चार रुग्णांनी आपल्या जीवनयात्रेचा शेवट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून करवून घेतला.

 

वास्तविक पाहता हे रुग्णालय कार्यान्वित होण्याअगोदर वा झाल्यानंतरही त्या ठिकाणचा कारभार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. फरक एवढाच की, अलीकडच्या काळातील रुग्णांच्या आत्महत्या सत्रामुळे चर्चेचे स्वरूप गंभीर वा चिंताजनक असे झाले आहे. राज्य शासनाच्या पुढाकाराने अशा स्वरूपाची विभागीय संदर्भ रुग्णालयं सुरू करण्याची कल्पना मांडली गेल्यानंतर आजवर प्रत्यक्षात राज्यामध्ये दोन अशी अद्ययावत रुग्णालयं सुरू झाली असून त्यातील एक अमरावतीला तर दुसरे नाशिकला आहे. विदर्भातील राजकीय नेत्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे अमरावतीच्या संदर्भ रुग्णालयात सर्व प्रमुख विभाग सुरू होऊन त्यानुसार रुग्णसेवा देखील सुरू झाली. त्यामध्ये प्रामुख्याने हार्ट, किडनी, कॅन्सर, प्लास्टिक सर्जरी, प्रसूती, बालरोग, अस्थिरोग यासह तब्बल बारा विभाग कार्यान्वित झाले आहेत. पण, नाशिकच्या संदर्भ रुग्णालयामध्ये आजपर्यंत कर्करोग, हृदय अन्् मूत्रपिंड हे तीन विभाग सुरू होऊ शकलेत.

 

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांचे स्वास्थ्य अबाधित असावे या उदात्त हेतूने युती शासनाच्या काळात अशा संदर्भ रुग्णालयांची कल्पना मांडली गेली होती. त्यालाच अनुसरून प्रत्येक विभागात एक असे एकूण सहा विभागात सहा रुग्णालयं सुरू करण्याचा मानस तत्कालीन शासनाचा होता. प्रत्यक्षात अमरावती व नाशिक या दोन ठिकाणीच अशी रुग्णालयं उभारली गेलीत अन्् कार्यान्वित देखील झाली. मात्र त्याचा लाभ रुग्णांना व्हायला हवा होता त्यानुसार तो होताना दिसत नाही. अमरावतीच्या रुग्णालयाची वाच्यता फारशी होताना दिसत नाही, पण नाशिक रुग्णालयाच्या नावे याआधीही प्रचंड बोंब होती अन्् आता तर रुग्णांच्या आत्महत्या सत्रामुळे त्यात दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे. या संदर्भ रुग्णालयाची दशकपूर्ती झाल्यामुळे त्यातील सेवा सुरळीत चालतील, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने रुग्णांवर उपचार होऊन ते ठणठणीत होतील, अशा अपेक्षा आहेत. पण नेमके उलटे घडते आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याऐवजी थेट मृत्यूलाच कवटाळत आहेत. एखाद्या महत्त्वपूर्ण शासकीय रुग्णालयाविषयीची प्रतिमा समाजमनात वाईट रीतीने बिंबवली जाणे ही बाब अतिशय गंभीर व चिंतेची आहे. नाशिक जिल्ह्याकडे आजवर राज्याच्या आरोग्ययमंत्रिपदाचा भार अनेक वेळा आला. डॉ. बळीराम हिरे, श्रीमती पुष्पाताई हिरे, डॉ. दौलतराव आहेर, डॉ. शोभाताई बच्छाव आदींचा त्यामध्ये समावेश होतो. थोडक्यात काय तर या चार मंत्र्यांच्या प्रत्येकी पाच वर्षांच्या कार्यकाळाचा विचार करता दोन दशकं राज्यातील जनतेचे आरोग्य सांभाळण्याचे काम नाशिकच्या पुढाऱ्यांनी केले आहे. देशातील असे हे एकमेव दुर्मिळ उदाहरण शोधून सापडणार नाही. त्यापैकी दोन जण आजही हयात आहेत, निवडणुकांचे वारे वाहू लागले की अधूनमधून त्यांचीही नावे चर्चेत येतात. दिवंगत डॉ. दौलतरावांचे उत्तराधिकारी डॉ. राहुल हेही निष्णात अस्थिरोगतज्ज्ञ अन्् आमदार आहेत. नियतीचा सूड बघा, सध्या राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे कारभारी म्हणून नाशिक विभागातीलच जामनेरचे रहिवासी गिरीशभाऊ महाजन आहेत. भाऊ, जसे वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री, तसेच नाशिक जिल्ह्याचेही पालकमंत्री आहेत. थोडक्यात काय तर डॉक्टर तयार करण्याचे काम भाऊंच्या देखरेखीखाली होते. म्हणजेच, रुग्णालय अन्् त्यांचे आरोग्य याचाही अप्रत्यक्ष संबंध येतोच.

 

हा हिशेब लक्षात घेतला तर भाऊंच्या रूपाने पुन्हा एकवार नाशिक जिल्ह्याकडे राज्याच्या आरोग्याची धुरा आहे. पण, नाशिक विभागीय संदर्भ रुग्णालयात रुग्ण आत्महत्या करून जीवन संपवत असतानाही भाऊ त्यावर अवाक्षर उच्चारायला तयार नाही. इमारत उभारली खरी, पण आजाराला तसेच वेदनांना कंटाळलेला रुग्ण हा कोणत्याही थराला जाऊ शकतो म्हणून संबंधितांकरवी खिडक्यांना मजबूत तावदानं लावण्याची दक्षता घेतली गेली नाही. तसे न झाल्याने आजघडीला रुग्ण आजाराला कंटाळून याच इमारतीच्या मजल्यावरून उड्या मारून ज्यांच्याकडे साक्षात परमेश्वर म्हणून आदराने बघितले जाते, त्याच डॉक्टरांच्या डोळ्यादेखत जीव देत असतील तर पालकत्वाच्या भूमिकेतील सरकारच्या दृष्टीने ही बाब भूषणावह म्हणता येणार नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...