आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग चौथ्या दिवशी चार घरे फोडली, २३ तोळे सोन्याचे दागिने, २८ हजारांची रोकड लांबवली 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निमखेडी शिवारातील हिराशिव कॉलनीत चोरट्यांनी घरफोडीत कपाट फोडून अस्ताव्यस्त फेकलेले साहित्य.  - Divya Marathi
निमखेडी शिवारातील हिराशिव कॉलनीत चोरट्यांनी घरफोडीत कपाट फोडून अस्ताव्यस्त फेकलेले साहित्य. 

जळगाव : तालुका पोलिस ठाण्यापासून अवघ्या ३०० मिटर अंतरावर असलेल्या दोन घरांमध्ये चोरट्यांनी सोमवारी रात्री घरफोडी केली. यात एका घरातून पावणेसहा लाख रुपये किमतीचे २३ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. तर दुसऱ्या एका घरातून राेकड चोरली. सलग चाैथ्यादिवशी चोरट्यांनी पोलिसांना थेट आव्हान देत घरफोड्यांचा सपाटा सुरू ठेवला आहे.     तालुका पोलिस ठाण्यापासून अवघ्या ३०० मिटर अंतरावर हिराशिवा कॉलनी आहे. या कॉलनीमधील सुनंदा राजेंद्र भावसार यांचे घर फोडले आहे. भावसार यांचे दोन मुले पुणे व मुंबई येथे राहतात. तर मुलगी धुळ्याला राहते. त्यांच्या पतीचे निधन झालेले असल्यामुळे त्या एकट्याच जळगावात राहतात. वडीलांचे श्राद्ध असल्याने ३ ऑगस्टपासूनl त्या नाशिक येथे गेल्या होत्या. तेथून त्या मुलगी कोमल हिच्यासह मंगळवारी पहाटे ५.३० वाजता घरी आल्या. यावेळी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-काेयंडा तोडलेला होता. त्यांनी कपाटे, ड्राॅवर तपासली असता सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, मंगळसुत्र, सोनसाखळ्या, कनातले, नाकातले, लहान मुलांचे दागिने व देवी देवतांचे दागिने व ब्लेझर, थ्रीपीस असा एकूण ५ लाख ६३ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.    रोकड लांबवून हजारोंच्या फर्निचरचे केले नुकसान  भावसार यांच्याच घरासमोर राहणाऱ्या काकासाहेब खंबाळकर यांच्याही घरी चोरट्यांनी सोमवारी रात्री डल्ला मारला. खंबाळकर दांपत्य १६ ऑगस्टपासून नाशिक येथे गेले होते. ते मंगळवारी पहाटे ३.४५ वाजता घरी आले. यावेळी त्यांच्याही घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला आढळला.    चोरट्यांनी त्यांच्या दुमजली घरातील प्रत्येक खोलीत सामान अस्ताव्यस्त केले. लाकडी कपाटांचे ड्राॅवर, दरवाजे तोडले होते. त्यांच्या घरातून सुमारे २५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. परंतु, हजारो रुपयांच्या फर्निचरची मोडतोड झाल्यामुळे नुकसान झाले आहे. खंबाळकर यांनी सोन्याचे दागिने वगैरे वस्तु बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलेले असल्यामुळे चोरट्यांच्या हाती लागू शकले नाही. दरम्यान, भालेराव यांच्या घरी दिड वर्षांपूर्वीदेखील चोरी झाली होती. त्यावेळी चोरट्यांनी तीन लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता.    मुलाच्या घरासाठी जपले हाेते साेन्याचे दागिने  भावसार यांच्या मुंबईत राहणाऱ्या मुलास घर घ्यायचे होते. त्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी भावसार यांनी घरातील सर्व सोन्याचे दागिने मोडण्याची तयारी केली होती. मोडीसाठी ठेवलेल्या या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे भावसार यांना धक्का बसला आहे. पोलिस ठाण्यात फिर्याद देत असताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. कष्टाने कमावलेल्या पैशातून पै-पै गोळा करुन त्यांनी सोन्याचे दागिने खरेदी केल्याचे त्या पोलिसांना सांगत होत्या.    ग.स.तील कर्मचाऱ्याच्या घरातून ऐवज चोरीला  राधाकृष्णनगरातील राजाराम हॉलजवळ राहणाऱ्या ग.स. सोसायटीतील कमर्चारी प्रशांत पंडित सपकाळे यांच्या घरातून चोरट्यांनी ३ हजार रोख व साेन्याची अंगठी असा मुद्देमाल चाेरून नेल्याचे मंगळवारी उघड झाले.    उपअधीक्षकांनी बैठक घेऊन पथके केली रवाना  शहरात रोज चोऱ्या, घरफोड्या होत आहेत. चोरटे पोलिसांना आव्हान देत आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनानेदेखील चोरट्यांसमोर हात टेकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी मंगळवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलिस ठाण्यांच्या डीबी पथकांची बैठक घेऊन सूचना केल्या. यानंतर घरफोड्यांचा तपास लावण्यासाठी काही ठिकाणी पथक रवाना केली.    दुचाकीवरील चोरट्यांना ये-जा करताना पाहिले  भालेराव आणि भावसार कुटंुबीय मंगळवारी पहाटेच बाहेरगावाहून घरी परत आले. त्यांच्या येण्याच्या काही मिनीटांपूर्वीच घरात हातसफाई केली आहे. भालेराव यांच्या शेजारी राहणाऱ्या अरुण पाटील यांनी मध्यरात्री दोन वाजता दुचाकीवरुन ये-जा करणाऱ्या तीन चोरट्यांना पाहिले होते. याच चोरट्यांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.    मनपाचे पथदिवे बंद, पोलिस गस्त नाहीच  हिराशिवा कॉलनीतील पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहे. या भागात पोलिस गस्त होत नाही. महापालिका व पोलिस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या भागात चोऱ्या होत आहे. असा आरोप भालेराव यांनी केला आहे. या दोन्ही घटनांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक पाचारण केले होते.    पोलिस अधिकाऱ्याकडे चोरीचा प्रयत्न : पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरांमध्ये देखील चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला आहे. गुजराल पेट्रोल पंप भागातील शिवराणानगरातील राजेंद्र लक्ष्मण महाजन यांचे घर चोरट्यांनी सोमवारी रात्री फोडले. ते सहा. पोलिस उपनिरीक्षक या पदावर मुख्यालयात सेवेत आहेत. ते काही दिवसांपासून पुणे येथे मुलाकडे गेले आहेत. त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त केला आहे. दरम्यान, घरातून काही चोरीस गेले नसल्याची माहिती समोर आले.    सात लाखांच्या सोन्यासह एका संशयितास अटक  एकीकडे चोऱ्या, घरफोड्या हाेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांना पकडण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू केले आहे. मंगळवारी त्यांनी शहरातून एका अट्टल चोरट्यास ताब्यात घेतले आहे. त्याची घर झडती घेतली असता सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले आहेत. या चोरट्याने घरातील फ्रीजमध्ये हे दागिने लपवून ठेवले होते. या शिवाय आणखी एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याने काही दिवसांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील एका बंगल्यात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. या दोन्ही चोरट्यांची कसून चौकशी सुरू आहे.   

बातम्या आणखी आहेत...