आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव : शहरात चोरी, घरफोडीचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांनी सलग तिसऱ्या दिवशी दोन घरांमध्ये चोरी केली. इंद्रप्रस्थनगर व प्रजापतनगर या दोन भागात चोरट्यांनी घरफोडी केल्याचे साेमवारी उघडकीस आले. शहरात पोलिसांचा धाक संपला असून, सातत्याने एकाच परिसरात चोरटे धुमाकूळ माजवत आहेत. त्यामुळे पोलिसांची रात्रीची गस्ती होत आहे की नाही? हाच प्रश्न आता निर्माण झाला आहे. शिवाजीनगर परिसरातील इंद्रप्रस्थनगरात मनोज पुंडलिक तिळवणे हे आई सिंधुबाई, पत्नी मंगला, मुले सुशांत व पीयूष यांच्यासह वास्तव्यास आहेत. ते बांभोरी येथील खासगी कंपनीत ऑपरेटर म्हणून नोकरीला आहेत. १७ ऑगस्ट रोजी सर्व कुटुंबीय रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी बऱ्हाणपूर येथे गेले. सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास गावाहून परतले. या वेळी त्यांच्या घराच्या मेन लोखंडी गेटचे कुलूप उघडल्यावर आतील दरवाजाचा कडीकोयंडा कापलेला दिसला. घरात पाहणी केली असता कपाट, पलंगातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. चोरट्यांनी गेटवरून उडी मारून प्रवेश करत घरातून अडीच तोळे सोने व ४० हजार रुपये रोख असा दीड लाखांचा एेवज लांबवला. नवीन घर घेण्यासाठी त्यांनी पैसे जमवले होते, त्यातच कंपनीत चार ते पाच महिन्यांपासून पगार होत नसल्याने या घटनेमुळे आर्थिक संकट ओढवले असल्याचे मनोज तिळवणे यांनी सांगितले. तिळवणे यांच्या घरी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी अंगणात शौच करून पोबारा केला. दरम्यान, कुंपणात एक प्लास्टिकची बॅटरी सापडली असून, ती चोरट्यांची असल्याचा अंदाज आहे. या परिसरात महापालिकेचे पथदिवे बंद असल्याने चोरट्यांचे फावत असून, पथदिवे सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गेल्या १५ दिवसांत १० ठिकाणी घरफाेडी झाली अाहे. त्यामुळे पाेलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उभे अाहे. दिवसा टेहळणी करून रात्री मारतात डल्ला; १५ दिवसांत १० घरफाेड्या जळगावातील इंद्रप्रस्थनगरात चाेरट्यांनी कपाट फाेडून फेकलेले साहित्य. पाेलिसांचा धाक संपला एकाच परिसरात सातत्याने चोऱ्या शहरातील इंद्रप्रस्थनगर व प्रजापतनगरात दोन दिवसांपासून सातत्याने चोऱ्या होत आहेत. यानंतरही पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवली नाही. परिसरातील पथदिवे बंद असल्यामुळे चोरटे मुजोर झाले आहेत. पोलिसांच्या गस्ती होत नसल्याने चोरटे सातत्याने एकाच परिसरात चोरी करण्याची हिंमत करीत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गस्तींचे नियोजन केले पाहिजे,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होते आहे. आईच्या अंत्यसंस्कारासाठी गावाकडे गेलेल्या मुलाचे घर चाेरट्यांने फाेडले ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापतनगरातील सुनंदिनी पार्कमध्ये राहणारे धर्मेश भोजराज पांडव हे ऑटो आयकॉनमध्ये व्यवस्थापक आहेत. पांडव हे पत्नी कोमल, मुलगा हर्षल व मुलगी हेमा यांच्यासह राहतात. पांडव यांचे आई-वडील यावल तालुक्यातील म्हैसवाडी गावी राहतात. १६ ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या आई प्रभावती यांचे निधन झाल्याने १७ रोजी सकाळी पांडव परिवारासह त्या ठिकाणी गेले. चोरट्यांनी घरी कुणीही नसल्याची संधी साधत रात्रीच्या सुमारास घराच्या कंपाउंडमध्ये प्रवेश केला. खिडकीवर चढत चोरट्यांनी बाहेरील बल्ब फोडला. त्यानंतर मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा कापत आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट, लाकडी कपाट फोडून एक हजार रुपयांची राेकड लंपास केली. कपाटात गॅस हंडी घेण्यासाठी गॅसच्या पुस्तकात ५०० रुपये ठेवलेले होते. चोरट्यांच्या हाती ते पैसे लागले नाही. सोमवारी सकाळी १० वाजता पांडव यांच्याकडे गॅस हंडी पोहाेचवण्यासाठी एजन्सीचा कर्मचारी आला होता. त्यावेळी समोर राहणाऱ्या एका महिलेने पांडव गावी गेले असल्याचे सांगितले; परंत त्या कर्मचाऱ्याने घराचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आणून दिले. तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात आले. पांडव यांना याबाबत कळवण्यात आले असून, ते आईच्या अंत्यविधीनंतरची सर्व कार्य आटोपल्यानंतर जळगावला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.