आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य अकादमी पुरस्कार परत करणार उर्दू पत्रकार शिरीन दळवी; म्हणाल्या- विधेयक गंगा जमुनी तहजीबविरुद्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशाच्या राज्यघटना, धर्मनिरपेक्षतेवर हल्ला -शिरीन
  • एकेकाळी वादग्रस्त चार्ली हेब्दो कार्टूनमुळे झाली होती अटक, असा होता वाद...

मुंबई - प्रसिद्ध उर्दू पत्रकार आणि साहित्यक शिरीन दळवी आपला राज्य साहित्य अकादमी पुरस्कार परत करणार आहेत. केंद्र सरकारने संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. लोकसभेनंतर बुधवारी त्याला राज्यसभेने देखील मंजुरी दिली. त्याचाच निषेध व्यक्त करताना त्यांनी हा निर्णय घेतला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा आपल्या राज्यघटनेवर, धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे असे त्यांनी सांगितले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक गंगा जमुनी तहजीब विरोधात -शिरीन


साहित्य अकादमी पुरस्कार परत देण्याची घोषणा करताना शिरीन दळवी यांनी सांगितले, "भाजप सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर केले यावर मी खूप दुखी आहे. हा देशाची राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे. याच अमानवीय विधेयकाचा  निषेध करताना मी साहित्य अकादमी पुरस्कार 2011 परत देत असल्याची घोषणा करत आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशात फूट पाडणारे आणि भेदभाव करणारे विधेयक आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पक्षात लढणाऱ्या माझ्या समुदाय आणि सहकाऱ्यांना साथ देण्यासाठी मी हा पुरस्कार परत करत आहे. गंगा जमुनी तहजीब आणि संविधान जपण्यासाठी आपल्याला ठाम राहावेच लागेल." असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत.

चार्ली हेब्दो कार्टूनमुळे वादात सापडल्या होत्या शिरीन

शिरीन दळवी लखनऊ येथील प्रसिद्ध उर्दू दैनिक अवधनामाच्या मुंबई आवृत्तीच्या संपादक होत्या. राज्य सरकारकडून त्यांना 2011 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. 2014 मध्ये फ्रेंच मॅगझीन चार्ली हेब्दोने मोहंमद पैगंबर यांचा वादग्रस्त कार्टून प्रसिद्ध केला होता. जगभरात या कार्टूनवरून मुस्लिमांनी निषेध व्यक्त केला असताना शिरीन यांनी आपल्या दैनिकांत तोच कार्टून छापला होता. या प्रकरणी झालेल्या निषेधानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर त्यांनी स्वतःचे उर्दू पब्लिकेशन सुरू केले. तसेच 2016 मध्ये उर्दू न्यूज एक्सप्रेस अशी वेबसाइट मुंबईतूनच सुरू केली.

वादग्रस्त कार्टून छापल्यानंतर केला होता पश्चाताप

2014 मध्ये चार्ली हेब्दो आणि वादग्रस्त कार्टूननंतर त्यांना देशभरातून टीकेला सामोरे जावे लागले. त्यावेळी एका माध्यमाशी संवाद साधताना त्यांनी आपली चूक मान्य केली होती. एक संपादक म्हणून दैनिकात काय छापले जात आहेत हे पाहणे माझी जबाबदारी होती. त्यावेळी मी कार्टूनवर लक्ष दिले नाही. लोक रोष व्यक्त करत असताना आपण 10 दिवस कारमध्येच होते. त्यावेळी काही लोकांनी माझे समर्थन सुद्धा केले. त्यांनीच मला नवीन वेबसाइट सुरू करण्यासाठी मदत केली असे त्या म्हणाल्या होत्या. या कार्टून प्रकरणी शिरीन यांच्या विरोधात 5 एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु, सर्वच प्रकरणांमध्ये हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला.