आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकाची एकही प्रत राज्यात विकू देणार नाही, असा इशारा अन्न नागरी व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी दिला. पोलिस आयुक्तालयात भरोसा सेलच्या उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी इशारा दिला.
जयभगवान गोयल लिखित “आज का शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत भुजबळ म्हणाले, नरेंद्र मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी करणे योग्य नाही, हा मूर्खपणा आहे. निवडणुकामध्ये शिवाजी महाराजांच्या नावे मते मागायची आणि पुस्तकात त्यांच्या सोबत तुलना करायची हे योग्य नाही.
पुस्तकाचे वितरण त्वरित थांबवा : आ. शिवेंद्रसिंहराजेंची मागणी
या सर्व प्रकरणावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज सातारा भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या पुस्तकाचे वितरण त्वरीत थांबवण्याची मागणी केली आहे. अति उत्साही कार्यकर्त्यामुळे हा प्रकार घडल्याचेही ते म्हणाले.
बाजारू पुस्तकाबद्दल प्रतिक्रियेची गरज नाही : अमोल कोल्हे, अभिनेते, खासदार
एखाद्या बाजारू लांगूलचालन करणाऱ्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. परंतु ‘काळ सोकावू नये’ म्हणून एवढंच सांगतो की, दगडाला शेंदूर फासला जाताना अनेकदा पाहिला. पण सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, रयतेच्या राज्याचे प्रतीक आहे. ते एकमेवाद्वितीय आहेत. हा अंगार साडेतीनशे पावणेचारशे वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या मनामनात धगधगत आहे...याचं भान ठेवा ...नाहीतर जाणीव करून देऊ.
भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : चाकणकर
“आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकाद्वारे भाजपची छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची वृत्ती दिसते. हे पुस्तक तातडीने मागे घ्यावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला विभाग भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिला.
छ.शिवाजी महाराजांपेक्षा कोणीही मोठा नाही : संभाजी ब्रिगेड
पुणे - “आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद सुरू झाला असून पुण्यात संभाजी ब्रिगेडने सोमवारी आंदोलन केले. मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी होऊच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज क्रूर व तडीपार नव्हते, तर त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नव्हते. त्यांनी नोटबंदी करून रयतेला रांगेत उभे केले नाही. भाजपने शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदी यांची तुलना करून त्यांचा “काळा इतिहास पांढरा’ करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत संभाजी ब्रिगेडने पुण्यातील लाल महालाजवळ मावळ्यांच्या पगड्या धारण करून पुस्तकाविरोधात निदर्शने केली. हे पुस्तक मागे घ्यावे, अन्यथा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही या वेळी संभाजी ब्रिगेडने दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.