आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या नावाने मुंबईत कन्व्हेन्शन सेंटर: गडकरी यांचे सूतोवाच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक दादर शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात बांधण्याचा मार्ग मोकळा होऊन त्याचे काम सुरू झाले असतानाच आता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतच वरळी येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक भव्य कन्व्हेन्शन सेंटर बांधण्याचे सूतोवाच केले आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असून यासाठी बीपीटीची दोन एकर जागाही देण्यास तयार असून आदित्य पुन्हा एकदा याबाबत सविस्तर बोलणी करण्यासाठी भेटावयास येतील, अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.   


सत्तेत असूनही शिवसेना-भाजपवर सतत टीका करत असली तरी भाजप नेत्यांनी मात्र सबुरीचा पवित्रा घेतला आहे. भाजप नेत्यांनी शिवसेनेला दुखवायचे नाही, असे ठरवले असल्याने आणि मातोश्रीशी चांगला संपर्क ठेवण्याचे धोरण आखले आहे. त्याचा लाभ नुकताच राज्यसभेच्या उपसभापतींच्या निवडणुकीत भाजपला झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले. आता बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने कन्व्हेन्शन सेंटरची योजना पुढे करून गडकरी यांनी भाजप-सेनेतील दरी आणखी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.   


गडकरी यांनी गप्पांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा विषय निघाला असता सांगितले, मी शिवसेना-भाजप संबंध, राजकारण याबाबत काही बोलू इच्छित नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे हे माझ्या हृदयात आहेत आणि मी त्यांना कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या आणि माझ्या संबंधात पक्ष कधीही आला नाही. ते नेहमी माझा उल्लेख, आमचा नितीन असे करत. ते आमचे दैवत आहेत. त्यामुळे कृतज्ञता म्हणून मुंबईत वरळी येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक भव्य कन्व्हेन्शन सेंटर बांधण्याचा विचार माझ्या डोक्यात आला. काही दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दिल्लीला आलेले असताना त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. महापौर निवासात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक तयार होत असून राज्य शासन त्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहे. यासोबतच बाळासाहेबांच्या नावाने एक स्मारक बनवावे, असे मला वाटते. वरळी कोळीवाड्यात मुंबई महानगरपालिकेची तीन एकर जागा असून त्यावर अतिक्रमण झालेले आहे. ही जागा रिकामी झाल्यास त्याच्याच बाजूला असलेली बीपीटीची दोन एकर जागा देऊन पाच एकरांत भव्य कन्व्हेन्शन सेंटर उभारणे शक्य आहे, असे मी आदित्य यांना सांगितल्याचे ते म्हणाले. 


असे असेल कन्व्हेन्शन सेंटर   
पाच एकरमध्ये तयार होणाऱ्या या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नागरिकांना फिरण्यासाठी एक मार्गिका तयार केली जाणार असून बसण्यासाठी एक दालनही तयार केले जाणार आहे. या ठिकाणी बसून नागरिक सी-लिंक आणि अरबी समुद्राचे दर्शन घेऊ शकतील. तसेच या ठिकाणी व्यावसायिक प्रदर्शनेही भरवली जाणार असून उद्योगवाढीसाठी त्याचा वापर होईल.

बातम्या आणखी आहेत...