Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Cooler cleaning with wet clothes; newly married woman died due to shock

ओल्या कपड्याने कूलरची सफाई; शॉक लागून नवविवाहितेचा मृत्यू, सत्यनारायण पूजेपूर्वीच काळाने डाव साधला

प्रतिनिधी, | Update - Jun 06, 2019, 09:09 AM IST

लग्न होऊन झाले होते १३ दिवस, सत्यनारायणाची पूजेच्या आदल्या दिवशीच मृत्यू

 • Cooler cleaning with wet clothes; newly married woman died due to shock

  गेवराई - घरातील कूलरची ओल्या कापडाने सफाई करताना कूलरमध्ये उतरलेल्या शॉकने नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे बुधवारी सकाळी घडली. घरात गुरुवारी सत्यनारायणाची पूजा होती. या पूजेच्या आदल्याच दिवशी विवाहितेचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. कोमल संजय शेलार (१९, रा. मादळमोही) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे


  कोमल हिचा २४ मे रोजी जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे मादळमोही येथील संजय शेलार या तरुणाशी विवाह झाला होता. बुधवारी सकाळी उठल्यावर कोमलने घरातील साफसफाई, सारवण केले. घरातील कूलरची ती ओल्या कापडाने सफाई करत असताना तिला विजेचा जोरदार शॉक बसला. यातच तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर कुटुंबातील लोकांनी आरडाओरड केली. ग्रामस्थांनी मदतीसाठी शेलार यांच्या घरी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत मादळमोही येथील आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.


  सत्यनारायणाची पूजेच्या आदल्या दिवशीच मृत्यू : कोमल व संजयचे २४ मे २०१९ रोजी लग्न झाले होते. ६ जून राेजी घरात सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती. परंतु सत्यनारायणाच्या पूजेच्या आदल्या दिवशीच कोमलवर काळाने घाला घातल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

  विजेच्या उपकरणांपासून काळजी घ्यावी
  उन्हाळ्यात मुख्यत: कूलरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र नागरिकांकडून पुरेशी काळजी घेतली जात नाही. बहुतांश घरांमध्ये अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर्स नसल्याने प्राणहानी होते. एखाद्याला विजेचा धक्का बसताच या उपकरणामुळे वीज पुरवठा खंडित होतो. शक्यतो पत्र्याची बॉडी असलेले कुलर वापरणे टाळावे. लहान मुले कूलरच्या थेट संपर्कात येऊ नयेत याची काळजी घ्यावी. कूलरची किंवा कोणत्याही विजेच्या उपकरणाची सफाई वीज प्रवाह बंद करूनच केली जावी. शक्यतो विजेची उपकरणे फायबर बॉडी असलेलीच खरेदी करावीत.

Trending