Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | copper pot water drinking health benefits in Marathi

तांब्याच्या भांड्यातील पाण्यामुळे होतात हे चमत्कारिक लाभ

दिव्य मराठी वेब,chrysanthemum.jpg | Update - Jun 09, 2019, 12:15 AM IST

शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी अनशापोटी प्यायल्यास त्याचा अधिक फायदा होतो

  • copper pot water drinking health benefits in Marathi

    पाण्याला तर जीवन संबोधले जाते, म्हणूनच निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम याचबरोबर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी हेच पाणी सकाळी अनशापोटी व तांब्याच्या भांड्यात ठेवलेले प्यायल्यास त्याचा अधिक फायदा होतो. काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपरिक वस्तूंची जागा पाश्चात्त्य संस्कृतीने घेतली. मग पाहा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी का प्यावे ?


    आयुर्वेदिक महत्त्व
    आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कफ, पित्त, वात) असते. त्यामुळे किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात समाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीची पाने टाकावीत.


    जखमा भरून काढण्यास मदत होते
    तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अँटिबॅक्टेरियल तसेच अ‍ँटिव्हायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत होते. तांब्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास नवीन पेशींची निर्मिती होते. तांब्यामुळे शरीराच्या आतील जखमा विशेषतः पोटातील जखमा लवकर भरण्यास मदत होते.


    चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात
    जर तुम्ही पडणाऱ्या अकाली सुरकुत्यांमुळे चिंतित असाल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी आता ही चिंता दूर करेल. कारण या पाण्यातील अँटीिक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. नवीन त्वचा निर्माण करण्यास मदत करते.


    हृदयरोग व रक्तदाब नियंत्रणात मदत करते
    'तांबे' रक्तदाब, हृदयाचे ठोके आटोक्यात ठेवतो तसेच कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये वाहणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो.


    वजन कमी करण्यास मदत होते
    फायबरने परिपूर्ण भाज्या, फळे आणि वजन कमी करण्याचे इतर सगळे मार्ग वापरूनदेखील तुमचे वजन कमी होत नाही? मग तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नक्की पिऊन पाहा. पचनसंस्थेला चालना देण्याबरोबरच हे पाणी शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यास मदत करते. शरीराला आवश्यक मेद शोषून घेतल्यानंतर चरबी वाढवणारे अनावश्यक मेद बाहेर टाकण्यास मदत करते. यामुळे तुमचे वजन काबूत राहण्यास नक्कीच मदत होते.


    कर्करोगाशी सामना करते
    आधुनिक जीवनशैलीत, आजकाल कर्करोग जडण्याची शक्यता वाढली आहे. अशा वेळेस तांब्याच्या अँटिऑक्सिडंट घटकांचा, कर्करोग जडण्याचे प्रमुख कारण असणाऱ्या शरीरातील फ्री-रॅडिकल्सशी सामना करण्यासाठी मदत होते. 'अमेरिकन कॅन्सर सोसायटी'च्या मते, तांबे नेमका कॅन्सरशी कसा सामना करते हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरीही विविध अभ्यासांनुसार तांब्यातील काही घटकांमध्ये कर्करोगाशी सामना करण्याचे सामर्थ्य असल्याचे समोर आले आहे.


    पचनसंस्थेला चालना मिळते

    पित्त, अल्सर किंवा पोटात गॅसचा विकार होणाऱ्यांसाठी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत हितकारक आहे. तांब्यातील जंतुनाशक गुणधर्मामुळे पोटातील जिवाणूंचा नाश होतो, जळजळ होण्याची समस्या कमी होते. तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ होतो, परिणामी पोट स्वच्छ राहण्यास मदत होते. पित्त दूर करण्यासाठी हे 8 पित्तशामक घरगुती उपाय नक्की करून पाहा.


    थायरॉइड ग्रंथींचे कार्य सुधारते
    तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहते. तांब्यातील खनिजे थायरॉइड ग्रंथींचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात व थायरॉइडच्या आजारापासून आराम मिळतो.


    अ‍ॅनिमियाशी सामना करते
    शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. अगदी पेशींची निर्मिती करण्यापासून ते पदार्थांतील आयर्न (लोह) व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते. म्हणूनच अ‍ॅनिमियाशी सामना करणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यातून आवर्जून पाणी प्यावे. तांबे रक्तातील लोह वाढवते व रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.


    त्वचेचे आरोग्य सुधारते व मेलॅनिनची निर्मिती होते
    तांबे शरीरात मेलॅनिनच्या निर्मितीमध्ये मदत करते. तसेच त्वचेच्या पेशींच्या निर्मितीत तांबे प्रमुख भूमिका बजावते. त्यामुळे रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते.


    सांधेदुखी दूर होते
    तांब्यात दाह दूर करण्याची क्षमता असल्याने संधिवाताच्या त्रासामुळे होणारी सांधेदुखी दूर होण्यास मदत होते. याचबरोबर हाडे मजबुतीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तांब्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने फायदा होतो.

Trending