आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काॅपी’चा शाेध!

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

‘काॅपी-कट-पेस्ट’चे जनक लॅरी टेस्लर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या ‘काॅपी-कट-पेस्ट’च्या फंक्शनने ज्ञानाचे जगच उजळून गेले. अर्थात त्यापूर्वीच अापल्या लाेकांनी लावलेल्या ‘काॅपी’च्या शाेधाने ज्ञानाचे जग पार झाकाेळून गेले अाहे! पण असेही म्हणून चालणार नाही. कारण ‘काॅपी’ हेच मुळी अापल्या भयावह व्यवस्थेचे अपत्य अाहे! मराठी भाषा गौरव दिन साजरा होऊन आठवडाही पूर्ण झालेला नाही. मराठीचे गायिलेले गोडवे अजून कानात गुंजनच घालताहेत. या भाषेविषयी अभिमान व्यक्त करताना फुललेली छाती अजून स्थायी अवस्थेत आलेली नाही. असे असताना मराठीच्याच परीक्षेत गुण मिळवण्यासाठी गैरप्रकारांनी हद्द गाठल्याच्या बातम्या ठिकठिकाणाहून आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा गावात परीक्षा सुरू होताच १५ मिनिटांत प्रश्नपत्रिका बाहेर आली. जळगाव शहरातही असे घडल्याच्या बातम्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात तर काॅपीबहाद्दरांनी काॅपीविरोधी पथकालाच बंधक बनवल्याचे सांगण्यात येते आहे. मराठी प्रांतातच मराठी भाषा विषयाची अशी अवस्था असेल तर केवळ गोडवे गाण्यात आणि मराठीच्या भवितव्याची चिंता व्यक्त करण्यात काय अर्थ आहे? भाषेसाठी किती मूलभूत काम करण्याची आवश्यकता आहे, याचेच प्रत्यंतर या काॅपी प्रकरणाने दाखवून दिले आहे. अर्थात, काॅपीचे असले गैरप्रकार केवळ मराठीच्याच परीक्षेत झाले आहेत असे नाही. सर्वच विषयांच्या परीक्षेचे चित्र हेच आहे. अलीकडेच सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेतही हेच घडले आहे. किंबहुना, वर्षानुवर्षे हेच घडते आहे. एकीकडे गुणांना आलेले महत्त्व आणि दुसरीकडे ते गुण संपादनासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानसाधनांचा खालावत चाललेला दर्जा या संकराची ही उत्पत्ती आहे. शिक्षण या क्षेत्राकडे राज्यकर्त्यांनी आणि धोरणकर्त्यांनीही गांभीर्याने कधी पाहिलेच नाही, याचीच ही पावती आहे. आपल्याकडे प्राथमिक शिक्षण हा हक्क म्हणून कायद्यानेच मान्य केला, पण हक्काने घ्यायचे हे प्राथमिक शिक्षण कोणत्या दर्जाचे असले पाहिजे, यावर मात्र कुणी बोलत नाही. सरकारलाही अशा विषयांवर बोलायचे नसते. कारण त्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदी करताना हात आखडता घेणारे सरकारच असते. ते कोणत्या विचारांचे आणि कोणत्या पक्षाचे आहे हा मुद्दा गौण ठरत आला आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या या ऱ्हासाला आणखीही बऱ्याच गोष्टी जबाबदार आहेत. शाळेतील किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात यावर शिक्षकांची पदाेन्नती आणि शाळांचे अनुदान अवलंबून असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले पाहिजेत यासाठीच शिक्षक आणि त्यांच्या शिक्षण संस्थाही काम करायला लागतात. शिक्षकच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना उत्तरे सांगताना आणि प्रश्नपत्रिका सोडवून देताना पकडले जातात ते त्यामुळेच. अनेक शाळा आणि महाविद्यालये तर काॅपी करून उत्तीर्ण करून देण्यासाठीच प्रसिद्ध आहेत. विद्यार्थ्यांना आणि त्यासाठी मदत करायला येणाऱ्या त्यांच्या पालकांनाच दोष देऊन भागणार नाही. एकूण व्यवस्थेबाबतच चिंतन करायची ही वेळ आहे, हे नक्की.  

बातम्या आणखी आहेत...