आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉपी प्रकरणाचा धसका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या कॉपीमुक्ती अभियान सर्व शाळापातळीवर जोमाने राबवण्यात येत आहे, पण आमच्या वेळी असे अभियान नव्हते. झेरॉक्स सेंटर जोरात चालत. पुस्तकांची पाने टराटरा फाडून पोटात खुपसून सर्रास नेली जात होती. मी दहावीला असतानाची गोष्ट, जिल्हा परिषद शाळेत नंबर आला होता. इंग्रजीचा पेपर असल्याने कॉपी जोरात चालणार असा अंदाज होताच. त्या वेळी अशा तपासण्या वगैरे नव्हत्या. गार्डिंगला आलेल्या गुरुजींनी दमदार आवाजातच सांगितले, आत्ताच कोणाकडे कॉपी, पुस्तक, गाइड असेल तर जमा करा. नंतर सापडल्यास वर्गातून हाकलून देईन. हॉलमधील मुलांनी त्यांचा इशारा हसण्यावारी नेला.

पेपर तसा अवघडच होता. मुलांचे चेहरे धास्तावलेले. तरीही कॉपी चालू झाली. मी मात्र जेवढे प्रश्न येतील तसे सोडवत गेलो. ग्रामरच्या भागातील प्रश्नांची उत्तरे मला चांगली येत होती. ती सोडवण्याच्या मागे लागलो. दोन तासांचा कालावधी संपला होता. निम्म्याहून अधिक प्रश्नांची उत्तरे झाली होती. इतक्यात माझ्या पायाजवळ टपकन कॉपी पडली. ती घेण्यासाठी उत्सुकतेने खाली वाकलो, अन् घात झाला. केंद्रप्रमुख सर हॉलमध्ये चक्कर टाकण्यास आले होते. त्यांच्या पावलांचाही आवाज आलेला नव्हता. त्यांनी मला कॉपी घेताना पाहिले. जवळ येऊन पकडले. माझ्या अंगाचा थरकाप उडाला.

कारण ते माझ्या वडिलांना ओळखत होते, त्यांचे मित्रच होते म्हणा! पण स्वभाव कडक शिस्तीचा असल्याने दरारा मोठा होता. त्यांनी माझ्या पाठीत हातानेच जोरदार ठेवून दिली. एक सणकच निघाली. मी कळवळलो. गुरुजी, मी कॉपी केलेली नाही. माफ करा! ते म्हणाले, एवढ्या चांगल्या घरचा. बाप इमानदार सराफ आणि तू कॉपी करतोस! चल, आता पेपर देऊन टाक, त्यावर काय अ‍ॅक्शन घ्यायची ते पाहतो. मला रडू येऊनही ते फुटेना. वर्गातील इतर मुलांनीही सांगितले, गुरुजी, त्याचा काहीच दोष नाही, कोणीतरी बाहेरून कॉपी फेकली, ती त्याने उचलली. हॉलमधील गुरुजींनीही त्यांच्या कानात तेच सांगितले असावे. केंद्रप्रमुखांनी माझ्याकडे रागाने पाहत हिसकावून घेतलेला पेपर माझ्या अंगावर फेकला अन् ते परत फिरले. न केलेल्या गुन्ह्यातून माझी सुटका झाली.