आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे तर भाजप-काळातील फोन टॅपिंगच्या चौकशीचे आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा दंगल हे तत्कालीन सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षड‌्यंत्र असल्याचा आरोप करत एसआयटी चौकशीची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला. यावरून राज्यात पुन्हा राजकारण तापलेे आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राचे पाऊल घटनाबाह्य असल्याची टीका केली. त्यावर माजी मुख्यमंत्री देवंेंद्र फडणवीस यांनी हा तपास एनआयएकडे वर्ग करणे याेग्य असल्याचे म्हटले आहे.

तत्पूर्वी, कोरेगाव भीमा हे भाजपचे षड‌्यंत्र असल्याचा आरोप गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यावर शिवसेनेचे माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पुराव्यांची खातरजमा करूनच कोरेगाव प्रकरणात गुन्हे दाखल केल्याचा पलटवार केला. कोरेगाव भीमा दंगल डाव्या विचारसरणीच्या लोकांनी घडवून आणल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. दंगलीस कारणीभूत अनेकांना पोलिसांनी अटक करून आरोपपत्रही दाखल केले आहे.

चळवळ संपवण्याचा भाजपचा अजेंडा

भीमा कोरेगाव हे षड‌्यंत्र आहे. महाराष्ट्रातील बहुजनांमध्ये भांडण लावण्याचा भाजपचा हा कट आहे. दलित समर्थकांना बदनाम करायचे आणि आंबेडकरी चळवळ संपवायची हा भाजपचा अजेंडा आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू होत आहे म्हणून मी आनंदी आहे. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री

कोर्टानेही ते पुरावे मान्य केलेेे : केसरकर

शरद पवार यांनी केलेल्या आरोपाला शिवसेनेचे माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, पुराव्यांची खातरजमा केल्यानंतरच कोरेगाव भीमा प्रकरणात डाव्यांविरोधात गुन्हे दाखल केले. आम्ही त्या पुराव्यांची खात्री केली आहे. न्यायालयानेही ते पुरावे मान्य केलेले आहेत. आता याबाबत चौकशी आयोग नेमला आहे. त्याच्यासमोरही पुरावे सादर केले जातील.

एनआयएकडे तपास घटनेविरुद्ध : गृहमंत्री

काेरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेने हाती घेतला आहे. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, राज्य सरकारने घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरवल्यानंतर केंद्र शासनाने हस्तक्षेप करून राज्य शासनाची कोणतीही परवानगी न घेता हा तपास एनआयएकडे दिला. हे घटनेच्या विरोधात आहे. केंद्राच्या या निर्णयाचा मी निषेध करतो.

  • भाजप-काळातील फोन टॅपिंगच्या चौकशीचे आदेश

फोन टॅपिंग ही तर विकृती : आव्हाड; ही आमची संस्कृती नाही : फडणवीस

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या वेळेस भाजप सरकारने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन आणि व्हॉट्सअॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश शुक्रवारी दिले. दरम्यान, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फोन टॅपिंग ही विकृती असल्याचा आरोप फडणवीस सरकारवर केला. भाजपने मात्र हे आरोप फेटाळून कोणत्याही यंत्रणेमार्फत चौकशी करावी, असे आव्हान दिले आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजप सरकारने फोन टॅप केल्याचा आरोप ट्विटच्या माध्यमातून केला होता. परंतु बरेच दिवस त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया कोणीही दिली नव्हती. मात्र आता महाविकास आघाडीने ही बाब गंभीरतेने घेतली असून याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पेगासेस, फोन टॅपिंगबद्दल भाजप अस्वस्थ

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फोन टॅपिंग ही विकृती असल्याचा आरोप फडणवीस सरकारवर केला. आव्हाड म्हणाले, पेगासेस आणि फोन टॅपिंगबद्दल भाजप प्रचंड अस्वस्थ आहे. याची चौकशी झाली पाहिजे. लोकांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची गरज काय आहे? तुमचे आणि माझे राजकीय मतभेद आहेत. ही विकृती असून याची चौकशी होत आहे. ही विकृती कोणी केली हे संपूर्ण देशाला आणि जगाला कळले पाहिजे. पेगासेस विकत घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला होता का, असाही प्रश्नही त्यांनी केला.

माजी सरकारमधील मंत्र्यांचे खुलासे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिलेले नव्हते. या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठाऊक आहे. शिवसेनेचे त्या काळात गृहराज्यमंत्री होतेच. तत्काळ चौकशी करून त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही या आरोपाचे खंडन करताना म्हटले की,टॅपिंगचा आरोप ज्या काळात होतोय त्या काळात गृहराज्यमंत्रिपद शिवसेनेकडे होते. केवळ आरोप करण्यात अर्थ नाही, असे कोणतेही टॅपिंग झालेले नाही.

माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, विशिष्ट परिस्थितीत फोन टॅप केले जातात. काँग्रेसच्या काळातही फोन टॅप झाले होते. दंगल, दहशतवादी कटाची परिस्थिती असेल तर परवानगी घेऊनच फोन टॅप करता येतात. माझ्याकडे खाते असताना फोन टॅपिंगचे प्रकार झाले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...